महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विशाळगड गजापूरच्या घटनेमध्ये बहुजन समाजाची पोरं होती. या आंदोलनावर वक्तव्य करणाऱ्या बालिश नेत्याची घरामध्ये बसून ब्लॉग करणारी मुले विशाळगड गजापूरच्या आंदोलनात का जात नाहीत ? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता मारला.
नर्सरी बागेत राजर्षी शाहू समाधी स्थळावर शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यापूर्वी झालेल्या सभेत सतेज पाटील बोलत होते.खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. दरम्यान नुकतेच खासदार महाडिक यांनी माजी पालकमंत्र्यांनी दोन वेळा दंगल होणार असे भाकीत केले आणि दोन्ही वेळा दंगल झाली त्यामुळे विशाळगड प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या दंगलीचा मुख्य सूत्रधार कोण हे शोधून काढले पाहिजे, अशी टीका केली होती. या टीकेला सतेज पाटील यांनी सभेत उत्तर दिले.जिल्ह्यामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमच्यावर सोशल मीडियावरून ट्रोलिंग केले जात आहे याकडे लक्ष वेधून आमदार पाटील यांनी खासदार महाडिक यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यातील बालिश लोक विशाळगड गजापूर येथे झालेल्या दंग्याबद्दल मला दोषी धरत आहेत. मी राज्याचे सहा वर्ष गृह खाते सांभाळले असलेने एखाद्या आंदोलनाच्या घटनेनंतर कोणती परिस्थिती उद्भवू शकते याचे भान आम्हाला आहे. तसेच आम्हाला समाजमन ही कळते.त्यामुळे विशाळगड आंदोलनापूर्वी आम्ही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती आम्ही व्यक्त केली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गजापूरला भेट दिली याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. उपमुख्यमंत्री पवार यांनी यासंदर्भात कोल्हापुरात सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी आदेश देण्याची गरज ही सतेज पाटील यांनी व्यक्त केली. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी कानाला हात लावून माफी मागितली असा खोटा प्रचार सोशल मिडियावर केला जात असून त्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची घोषणाही पाटील यांनी केली. गजापूर परिसरात इंडिया आघाडीची पदाधिकारी गेल्यानंतर दंग्यात होरपळणाऱ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याची आठवण जिल्हा प्रशासनाला आली. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापूरला येऊ नये .कोल्हापूर वरील संकट हे कोल्हापूरचे लोक एकही दाखवून दूर करतील .त्यासाठी कोल्हापूरकर सक्षम आहे असेही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा
विशाळगड प्रश्नावर १००% फेल गेलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. कोल्हापुरात धार्मिक तेढ माजवणाऱ्या वारंवार घटना घडत असून यावर आवाज उठवण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सद्भावना रॅली काढण्यात आली आहे. आम्ही शांतता निर्माण करण्यासाठी रॅली काढत असतानाही आम्हाला ट्रॉलिंग केले जात आहे. त्यामुळे समाज कुठे जाणार? असा सवाल त्यांनी केला. राज्याची मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी विशागड प्रश्नावर केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे अशी टीकाही त्यांनी केली. विशाळगडावर सर्व जाती धर्माच्या लोकांची अतिक्रमणे होती पण प्रशासनाने कोर्टाचे कारण सांगून अतिक्रमणे काढण्यास विलंब लावला .विशाळगडावर दंगा घडवायचा होता आणि त्यानंतर अतिक्रमण काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यांना स्वतःला हिरो व्हायचे होते अशी शंका निर्माण झालेली आहे.