बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड, सीमावाद चिघळला
schedule06 Dec 22 person by visibility 620 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथे महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. बेळगाव येथील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर हा प्रकार घडला. दुपारी एक वाजता घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्नाटकला जशास तसे उत्तर देऊ असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेने केलेल्या राडानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कर्नाटकच्या बसेसना काळे फासण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांच्या आरेला कारे म्हणावे " अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मौका सभी को मिलता है. मराठी माणूस हा सीमा बांधवांच्या पाठीशी आहे अशा शब्दात कर्नाटक सरकारला इशारा दिला. कन्नडिगांच्या मुजोरीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन गेले काही दिवस वातावरण तापले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्रातील काही गावावर दावा सांगितल्यामुळे हा वाद आणखी चिघळला. दुसरीकडे महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई हे मंगळवारी 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या दौऱ्यावर बंदी घातली.
मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला चढवला. जवळपास दहा वाहनांची मोडतोड केली. कन्नड रक्षण वेदिकाच्या उच्छादानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांनी कोगनोळी टोल नाका येथे जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला. इचलकरंजी येथे मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट निशाणा साधताना हा महाराष्ट्र तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.