व्यापक समाजहितासाठी माध्यमांचा जबाबदारीने वापर व्हावा –डॉ. अशोक चौसाळकर
schedule06 Jul 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक

कोल्हापूर, दि. ६ जुलै: ‘माध्यम हे दुधारी असते, माध्यमकर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर केला पाहिजे. माध्यम आणि अभिव्यक्ती साक्षरता ही काळाजी गरज आहे. त्यामध्येही माध्यमांना मोलाची भूमिका बजावण्याची संधी आहे.’असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारा मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रह आणि ‘समाज आणि माध्यमं’ हे अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे माध्यमविषयक पुस्तक यांचा संयुक्त प्रकाशन सोहळा येथील राजर्षी शाहू सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. या पुस्तकांना प्रस्तावना लिहिणारे साहित्यिक राजन गवस व डॉ. रणधीर शंदे यांचा सत्कार करण्यात आला.
‘डॉ. जत्राटकर यांची दोन्ही पुस्तके चांगली झाली असून येथून पुढील काळात त्यांच्याकडून अधिक चांगल्या निर्मितीची अपेक्षा त्यांचा शिक्षक म्हणून मी बाळगून आहे, ’असेही चौसाळकर म्हणाले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. आलोक जत्राटकर हे भोवतालाकडे संवेदनशीलतेने आणि वैज्ञानिक चिकित्सक नजरेतून पाहणारे व्यक्तीमत्त्व आहे. राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ व ‘समाज आणि माध्यमं’ या दोन्ही पुस्तकांतून डॉ. जत्राटकर यांची दोन वेगवेगळी रुपे सामोरी येतात.
कुलगुरू शिर्के म्हणाले, समाज आणि माध्यमं या पुस्तकातून डॉ. जत्राटकर यांनी नवमाध्यमांतील त्रुटींची अतिशय परखडपणे जाणीव करून दिलेली आहे. ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या पुस्तकातील प्रत्येक लेखामधून जगण्याचे, जीवनाचे एक मूल्य त्यांनी सांगितले आहे. एक संवेदनशील लेखक, माणूस म्हणून ते वाचकांच्या हृदयाला हात घालतात. यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री कासोटे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. अमेय जोशी यांनी आभार मानले.