उद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रम
schedule24 Aug 26 person by visibility 19 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उद्योगांसाठी नवीन व्यावसायिक व पुरवठा साखळीच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी एमएसएमई डीएफओ, एमसीसीआयए आणि कोल्हापुरातील पाच प्रमुख औद्योगिक संघटनांचा संयुक्त पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २६ व २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दोन दिवसीय 'विक्रेता विकास कार्यक्रमाचे व उत्पादनांच्या प्रदर्शनाचे' आयोजन केले आहे. यामध्ये उत्पादनांचे प्रदर्शन असेल. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकणंगले (मॅक) येथे प्रदर्शन होत आहे.
मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मॅक शिरोलीचे अध्यक्ष जयदीप चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रतिनिधींसाठी प्रदर्शनातील सहभाग सभासदांना दोन्ही दिवशी मोफत आहे. या दोन दिवसात ४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शिवाय पंधराहून अधिक स्टॉल्स असतील. महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देशांतर्गत तसेच जागतिक पुरवठा-साखळीत अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील विकास कार्यक्रम होत आहे.
हा उपक्रम केवळ प्रदर्शन किंवा परिसंवादापुरता मर्यादित नसून, प्रत्यक्ष विक्रेता विकास आणि बाजारपेठेची उपलब्धता व त्यातील प्रवेश यावर केंद्रित आहे. सहभागी उद्योगांना मोठ्या कंपन्यांच्या आऊटसोर्सिंग गरजा, गुणवत्ता मानके (क्वालिटी स्टँडर्ड्स) आणि विक्रेता नोंदणी प्रक्रियेची माहिती मिळणार आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुणे आणि कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांमधील सहकार्य होय. पुण्याची अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल, संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील विविधांगी क्षमता तसेच कोल्हापूरचा भक्कम उत्पादन पाया यांचा परस्परपूरक वापर करून उद्योगांना नवीन बाजारपेठा आणि पुरवठा साखळीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पत्रकार परिषदेला ट्रेझरर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागलचे अमृतराव यादव, सचिव शंतनु गायकवाड, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे सचिव प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.