सत्तेचा मुकुट नव्हे तर माझ्यासाठी जनतेचे प्रेम महत्वाचे – आमदार सतेज पाटील
schedule13 Jan 26 person by visibility 24 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज् वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सत्तेचा मुकुट नव्हे तर माझ्यासाठी जनतेचे प्रेम महत्वाचे आहे. कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, काँग्रेसचा जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्यासाठी येत्या पंधरा जानेवारीला काँग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.’असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कसबा बावडा येथे जाहीर सभा आयोजित केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली. खासदार शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी होते. डीवाय ग्रुपचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी सभेत नागरिकांशी संवाद साधला.
या सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी, महायुती सरकारवर टीकेचा भडीमार केला. ‘महायुती सरकाकडून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. सत्ता आणि पैशाच्या जोरावर उमेदवार आणि मतांची खरेदी सुरू आहे. शिव शाहू आंबेडकरी विचारांवर बुलडोझर चालविला जात आहे. ही सत्तेची लढाई नव्हे तर विचारांची लढाई आहे. या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना बळ देऊन कोल्हापूर हा पुरोगामी असल्याचे दाखवून द्या’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. सपकाळ यांनी भाषणात आमदार थेट पाइपलाइन योजनेचा संदर्भ देत सतेज पाटील यांचा उल्लेख पाणीदार आमदार असा केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे नेते, मंत्री प्रचाराला आले. यावरुन येथील जनता महायुतीच्या स्थानिक नेत्यांचे ऐकत नाही हे स्पष्ट दिसते. महायुतीकडून निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होत आहे. बिनविरोध निवडीच्या नावाखाली मतांचा हक्क हिरावला जात आहे. महापालिका निवडणुकीत कोल्हापूरच्या जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहील हा विश्वास आहे.’ खासदार शाहू महाराज भाषणाला उभे राहिल्यांनतर पावसाला सुरुवात झाली.तो संदर्भ पकडत महाराजांनी, ‘महाविकास आघाडीची सभा आहे. पावसाला सुरुवात झाली, म्हणजे आपला विजय निश्चित आहे.’असा विश्वास व्यक्त केला. सभेला बाळासाहेब सरनाईक, डॉ. उदय नारकर, सतीश कांबळे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.