अॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा
schedule24 Mar 23 person by visibility 404 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शाळकरी मुलींवर अॅसिड फेकतो अशी धमकी देणाऱ्या आरोपी विक्रम उर्फ विकी राजेंद्र पोलादे (वय ३९, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. तिडके यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अमिता कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
या खटल्याची माहिती अशी की पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, गांधी मैदान आणि खाऊ गल्ली परिसरात दोन मुलींचा आरोपी विकी पोलादे पाठलाग करायचा. खाऊ गल्लीतही आरोपींने मुलीचा हात धरुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुलींने विरोध केला होता. एक ऑगस्ट २०१७ रोजी एका मुलीचा त्याने पाठलाग केला तर दुसऱ्या मुलीकडे मोबाईल नंबरची वारंवार मागणी केली. दोघींनी मुलींनी आरोपीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असता सायंकाळपर्यंत मोबाईल नंबर न दिल्यास दोन्ही मुलींच्या अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उप निरीक्षक टी.आर.पाटील यांनी तपास केला. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर अन्य पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. या खटल्यात सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी सह साक्षीदार तपासले. फिर्यादी, पीडीत मुली, इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील कुलकर्णी यांनी युक्तीवादात हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टाच्या निकालेची दाखले दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश तिडके यांनी आरोपी पोलादे याला सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.