महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम
schedule17 Feb 26 person by visibility 9 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महानगरपालिका हे आपले घर समजून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जबाबदारीने काम करावे, असे आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिकाच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. निकम यांनी सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक घेतली. येत्या आठ दिवसांत प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील. असेही त्या म्हणाल्या. महापौर निकम यांनी आपण दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेत उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले.
शहरातील स्वच्छतेची परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद करत त्यांनी विशेष स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबविण्याची सूचना केली. विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्री देण्याची गरज व्यक्त केली. अतिक्रमणमुक्त व स्वच्छ शहरासाठी आठ दिवस स्वतंत्र वाहनाद्वारे जनजागृती करण्यात यावी. मुदत संपल्यानंतर मुख्य रस्ते, बंद गाड्या व इतर अतिक्रमणांवर तातडीने कारवाई सुरू करावी, असे त्यांनी सांगितले. रस्त्यांची कामे करताना प्रथम ड्रेनेज, पाणी लाईन व गटर्सची कामे पूर्ण करूनच रस्ते करावेत. अन्यथा रस्ता खुदाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. महापालिकेतील सत्कारप्रसंगी बुकेऐवजी पुस्तक, सन्मानचिन्ह किंवा पेन देण्याची पद्धत अवलंबावी. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौर अक्षय जरग यांनी शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश दिले. शहरातील उद्यानांची दुरावस्था लक्षात घेता वॉचमन नियुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापौरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्यलेखाधिकारी श्रीमती राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, नगरसचिव सुनिल बिद्री उपस्थित होते.