जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांना गल्लीबोळात फिरायची वेळ आणली–राहुल देसाई
schedule17 Feb 26 person by visibility 17 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एका बाजूला आमदार, मंत्री तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते. या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार हा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला. यामुळे मंत्र्यांना गल्लीबोळात फिरायची वेळ आली.’असा टोला बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी लगाविला.
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांच्या विजयी सदस्यांचा सत्कार सोमवारी, (१६ सोळा फेब्रुवारी २०२६) कोल्हापुरात झाला. खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राजू आवळे, राजू किसन आवळे, ऋतुराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रस कमिटीत हा कार्यक्रम झाला. विजयी सदस्यांच्या वतीने राहुल देसाई यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
देसाई म्हणाले, ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक काँग्रेसने नेटाने लढविली. कार्यकर्ते कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ दिले. काँग्रेसची विचारधारा घेऊन कार्यकर्ते घरोघरी पोहचले. मतदारांचा वाढता प्रतिसाद काँग्रेसला मिळाला.मतदार व कार्यकर्त्यांचा हा प्रतिसाद पाहून मंत्र्यांना गल्लीबोळात प्रचाराला उतरण्याची वेळ आली.’ दरम्यान भुदरगड तालुक्यातील गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिव - शाहू आघाडीतर्फे राहुल देसाई यांच्या पत्नी रश्मी देसाई या निवडून आल्या आहेत.