बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
schedule06 Apr 23 person by visibility 774 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
आठ वर्षाच्या बालिकेवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. तिडके यांनी आरोपी दत्तात्रय अशोक काटे (वय २७, रा. स्वामी समर्थ नगर, जरगनगर) याला सहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात अमिता कुलकर्णी यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
आरोपीने आठ वर्षाच्या बालिकेशी जवळीक साधून तिला पळवून नेले होते. त्याने सलग दोन दिवस जत, जाडरबोबलाद या ठिकाणी बालिकेवर अत्याचार केले होते. बालिकेच्या नातेवाईकांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी दत्तात्रय काटे याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन उप निरीक्षक भरत पाटील यांनी केला. त्यानंतर कोर्टात आरोपपत्र दाखल केले. कोर्टात सुनावणीच्यावेळी सरकारी वकील कुलकर्णी यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी, पिडीत मुलगी आणि इतर साक्षी महत्वाच्या ठरल्या. एक साक्षीदार फितूर झाली. सरकारी वकील कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद, त्यासाठी सुप्रीम कोर्टातील सादर केलेले निवाडे यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश तिडके यांनी आरोपी काटे याला सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.