राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणार
schedule01 Aug 26 person by visibility 34 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती सेसमुळे व्यापारी व ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार, व्यापारातील वाढत्या अडचणी, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारे प्रतिकूल परिणाम, दुबार कर आकारणी या विरोधात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत नष्टे लॉन, बसंत-बहार रोड, महावीर गार्डन येथे मार्केट सेस रद्द होणेबाबत राज्यव्यापी परिषद होत आहे. या परिषदेसाठी राज्यातून व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असे संयोजकांनी कळविले आहे. दरम्यान व्यापारी प्रतिनिधींनी, खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन मार्केट सेस रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच स्थानिक आमदारांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर प्रमाणेच उर्वरित जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात यावेत असे पूर्वी ठरले होते. त्याप्रमाणे ज्या त्या जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निवेदने देण्यात येणार आहेत.