महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालन
schedule31 Jul 26 person by visibility 10 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण भागातील महिला कारागीरांच्या हस्तकौशाल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी व हँडमेड बास्केट ह्या सारख्या उत्पादनांना कोल्हापुरात हक्काचे दालन मिळाले. ‘कलापुरीचे कलादालन’मध्ये या वस्तू खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या सर्व वस्तूंना देशात व विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे ‘कलापुरीचे कलादालन’चे प्रमुख अपर्णा चव्हाण व सल्लागार प्रा. श्रीधर वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अपर्णा चव्हाण व आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी स्टार्टअप सुरू केले. आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. पन्हाळा तालुक्यातील मोरेवाडी येथे कलापुरीचे कोल्हापुरी चप्पल युनिट, यळगुड येथे पारंपारिक दागिन्यांचे यूनिट व मिरज तालुक्यातील सोनी येथे हँडमेड बास्केट युनिटच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी कलापुरीने उपलब्ध करून दिली आहे. लक्ष्मीपुरीत उमा टॉकीज नजीकच्या रोडवर कलापुरीचे कलादालन” साकारले आहे. या कलादालनात जी.आय. मान्यताप्राप्त कारागिरांनी बनविलेल्या आरामदाई व विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ असे नानाविध मनमोहक पारंपरिक दागिने आणि दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त अशा हँडमेड बास्केटस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २ ऑगस्ट २०२६ रोजी कलादालनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेवळी अमृता काळे उपस्थित होत्या.