ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा
schedule01 Aug 26 person by visibility 18 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम,कोल्हापूर चित्पावन संघ आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वा.रा तथा दादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रोहिणी परांजपे यांचे " संतांचे संगती" या विशेष निरूपण सोहळ्याचे आयोजन ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केले आहे. अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राम गणेश गडकरी सभागृह,पेटाळा येथे दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत निरुपण सोहळा होणार आहे. या निरुपण सोहळयात संत महात्म्य आणि संत चरित्र ऐकण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना घेता येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या निरूपणामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या अलौकिक गाथा सांगण्यात येणार आहेत. तरी आत्मानंद देणाऱ्या या भक्तीमय सोहळ्याचा लाभ आवर्जून घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीने करण्यात आले.हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रम दिलेल्या वेळेत सुरू होणार असल्याने उपस्थित श्रोत्यांनी वेळेच्या दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेस चित्पावन संघाचे प्रसाद भिडे , श्रीकांत लिमये , मिलिंद पावनगडकर , नंदकुमार मराठे,श्रीराम टोपकर,सचिन जिल्हेदार, संतोष कोडोलीकर , धर्मराज पंडित,डॉ. उदय कुलकर्णी, अनिरुद्ध जावडेकर अशोक जोशी आदी उपस्थित होते.