स्टेट बँक स्टाफ युनियन सर्कल कोल्हापूरतर्फे भरती स्पर्धा मार्गदर्शन शिबिर
schedule08 Feb 25 person by visibility 327 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन मुंबई, सर्कल कोल्हापूर युनिटच्यावतीने स्टेट बँक भरती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. दैवेज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग सभागृह येथे आयोजित या मार्गदर्शन शिबिराला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरात कोल्हापूर व परिसरातून परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या शंभरहून अधिक परीक्षार्थींनी उपस्थिती लावली.
स्टेट बँकेतर्फे मार्च महिन्यामध्ये देश पातळीवरील भरतीसाठी परीक्षा होणार आहे. या पाश्वभूमीवर शिबिराचे आयोजन केले होते. या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन बँकेच्या कोल्हापूर विभागाचे रिजनल मॅनेजर राजी गुप्ता व स्टाफ युनियनचे अध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताान राजीव गुप्ता यांनी देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेमध्ये कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा फायदा घेऊन उत्तुंग यश मिळवावे. भारतातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेत आपले उज्वल भविष्य निश्चित करावे असे सांगितले. स्टाफ युनियनचे अध्यक्ष सुरेश चिंदरकर व एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे क्षेत्रीय सचिव सूर्यकांत माळी यांनीही आपल्या मनोगतात शिबिराचे महत्व अधोरेखित केले.
या शिबिरात बँकेचे अधिकारी व मुंबईमधील बँक स्पर्धा परीक्षांचे प्रसिद्ध मार्गदर्शक किशोर पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बँकेच्या परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेसंदर्भातील विस्तृत मार्गदर्शन केले.
सागर भगत व पेन्शनर असोसिएशनचे सचिव प्रदीप हत्ती यांनीही परीक्षेतील घटकांच्या तयारीविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरास बोर्डिंगचे अध्यक्ष विजय घारे, स्टाफ युनियनचे रिजनल सेक्रेटरी जयराम किरुळकर, ऑफिसर्स असोसिएशनचे उपसचिव योगेश पूरेकर, संजय हावळ, स्नेहल पोवार व बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.