राजारामपुरीत पार्किंगची सुविधा, सुसज्ज क्रीडागंणासाठी प्राधान्य
schedule04 Jan 26 person by visibility 35 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजारामपुरी ही कोल्हापूर शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. खरेदीसाठी ग्राहकांची मोठी संख्या असते. शिवाय या परिसरात हॉस्पिटल्सची संख्या जास्त आहे. या साऱ्या बाबींचा विचार करुन राजारामपुरीत नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंगची सुविधा आणि परिसरातील मुलांच्याकरिता सुसज्ज क्रीडांगणासाठी प्राधान्य राहील.’ असे प्रभागमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक पंधरामधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी प्रचार फेरीचे आयोजन केले आहे. याप्रसंगी उत्तुरे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. उत्तुरे या २०१५ ते २०२० या कालावधीत महापालिकेत नगरसेविका होत्या. राजारामपुरी-तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल या प्रभागातून त्या निवडून आल्या होत्या. स्थायी समितीवर त्यांनी काम केले आहे. सभागृहातील चर्चेत सहभाग असायचा. यंदा त्या प्रभाग पंधरामधून निवडणूक लढत आहेत. त्या, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून त्या लढत आहेत. प्रभाग पंधरामध्ये महाविकास आघाडीतंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातून रोहित शिवाजीराव कवाळे, सर्वसाधारण महिला गटातून अश्विनी अनिल कदम व सर्वसाधारण गटातून संजय मोहिते हे उमेदवार आहेत.पंधरामधील चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे या रॅलीत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला.
दरम्यान या प्रभागातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, ‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रभागात मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचा भर हा विकासकामांवर आहे. यापुढेही संपूर्ण प्रभागाच्या गरजा विचारात घेऊन विकास करू. चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्यामुळे नवा भाग समाविष्ठ झाला आहे. नवीन भागातही तितक्याच जोमाने विकास कामे केली जातील. केवळ निवडणुकापुरता नव्हे तर प्रभागात आमचा संपर्क हा कायम असतो. जो भाग विकासापासून वंचित आहे, त्या ठिकाणी विविध योजनेद्वारे चेहरामोहरा बदलू.’