विद्यार्थ्यांनो स्वप्नं पाहा, आयुष्यात मोठे व्हा : प्रा.जयसिंग सावंत
schedule04 Jan 26 person by visibility 140 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो स्वप्नं पाहा, आणि त्या स्वप्नांना मूर्त रुप देण्यासाठी अथक प्रयत्न करा. लहानसहान अडचणी, संकटांनी डगमगून जाऊ नका. संघर्ष जितका मोठा, यश त्याहून मोठे असते.’अशा शब्दांत व्याख्याते प्रा. जयसिंग सावंत यांनी शाळकरी मुलांना प्रोत्साहित केले.
वळसंग येथील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल व भाग्यश्री माळी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला’आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे यंदा सातवे वर्षे आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. सावंत यांनी गुंफले. याप्रसंगी त्यांनी, ‘जगायचे आहे हसत’या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांना करिअर, संस्कार व वाचनाचे महत्व, जगण्यातील चांगुलपणा यासंबंधी मार्गदर्शन केले.
उद्योजक राजेंद्र शंकर चमकेरी यांच्या हस्ते या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवारी (३ जानेवारी २०२६) सायंकाळी झाले. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कपिलदेव काशीराम पारसे हे प्रमुख पाहुणे होते. सरपंच पूजा रमेश माळी अध्यक्षस्थानी होत्या. हायस्कूलच्या पटांगणावर हा कार्यक्रम झाला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली जाते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रा. सावंत यांनी सहजसोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कधी मराठी व हिंदीतील कवितेच्या ओळी सादर करत तर कधी थोरामोठयांच्या जीवनचरित्रातील दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. ‘पुस्तकांशी मैत्री करा, ज्ञानात भर पडते. वाचन हेच आपल्याला वाचवते. थोरामोठयांच्या जीवनचरित्रातून आपणाला यशस्वी जीवनाची सूत्रे सापडतात. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात काम करा. त्यामध्ये मोठे व्हा, त्यासाठी स्वप्नं पाहा.’ अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच सावंत यांनी, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनी खेळाडूला पाचशे रुपयांचे बक्षीस दिले. विद्यार्थिनीने ते बक्षीस शाळेला भेट म्हणून दिले. संस्थेचे चेअरमन व ट्रस्टचे अध्यक्ष सीए एस. व्ही. माळी यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील हेतू सांगितला. मुख्याध्यापक गणी काकतीकर यांनी स्वागत केले. या व्याख्यानाला शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.