प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद, तरुण उमेदवारांची वाढतेय उमेद
schedule04 Jan 26 person by visibility 154 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रविवारच्या सुट्टीची संधी साधत महायुतीच्या उमेदवारांनी प्रभागात फेरी काढत वैयक्तिक संपर्कावर भर दिला. प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक तेरामध्ये महायुतीच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराचा धडाका लावला. मतदारांच्या गाठीभेटी घेत महायुतीला आवाहन करण्याचे आवाहन केले. दरम्यान शनिवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक अकरामधील शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत जाधव व तेरामधील शिवसेनेचे उमेदवार ओंकार जाधव यांनी काढलेली प्रचार फेरी चर्चेची ठरली. या प्रचार फेरीने चांगलीच वातावरण निर्मिती केली. नागरिकांचा हा प्रतिसाद तरुण उमेदवारांची उमेद वाढविणारा ठरत आहे.
प्रभाग क्रमांक अकरामध्ये महायुतीकडून शिवसेनेकडून सर्वसाधारण गटातून तरुण उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव, भाजपकडून माधुरी नकाते, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून राष्ट्रवादीच्या यशोदा मोहिते, तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपच्या निलांबरी साळोखे आहेत. तर प्रभाग क्रमांक तेरामधून सर्वसाधारण गटात शिवसेनेकडून राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार संभाजी जाधव, राष्ट्रवादीकडून नियाज खान, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून भाजपच्या रेखा रामचंद्र उगवे तर अनुसूचित जाती महिला गटातून भाजपच्या माधुरी शशिकांत व्हटकर उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक तेरामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी संयुक्तपणे शास्त्रीनगर, मंगेशकरनगर येथून रॅली काढली. मतदारांना अभिवादन करत निवडून देण्याचे आवाहन केले. प्रभाग क्रमांक अकरामधील उमेदवार सत्यजीत जाधव यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी संपर्क मोहिम राबविली. जाधव यांच्या कुटुंबांतील सदस्य प्रचारात सक्रिय आहेत. मतदारांनी संपर्क साधून निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.