शिवाजी विद्यापीठामध्ये ऑनलाईन एमबीए, विद्यार्थ्यांच्या करियरसाठी सुवर्णसंधी
schedule14 Sep 25 person by visibility 38 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मार्फत ऑनलाईन एम.बी.ए.अभ्यासक्रम सुरु केला आहे. विद्यार्थी,नोकरदार व महिलांना शिक्षण तसेच नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा हा अभ्यासक्रम आहे.ऑनलाईन एम. बी. ए. अभ्यासक्रम हा नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद मान्यताप्राप्त असून विद्यार्थ्यांना पाच विषयांपैकी कोणत्याही दोन विषयात ऑनलाईन एम.बी.ए.पदवी प्राप्त करता येईल. या अभ्यासक्रमाचे स्वरुप, त्याची उपयुक्तता यासंबंधी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. नगिना माळी यांनी माहिती करुन दिली आहे.
आजच्या बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्र डिजिटलाइझेशनच्या प्रभावाखाली आलेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता,ऑटोमेशन,ऍडव्हान्स तंत्रज्ञान आणि शिक्षण या बाबींचे एकत्रित समीकरण झाले आहे.आज जागतिक पातळीवर ऑनलाईन अभ्यासक्रमाने भरारी घेतली आहे. कोणत्याही ठिकाणाहून,कोणत्याही अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येते.विशेष महत्वाचे म्हणजे कोविड -१९ नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती महत्वाची ठरली आणि या पद्धतीमुळे आपल्या सोयीनुसार,वेळेनुसार शिक्षणाचे दरवाजे सर्वांनाच जागतिक पातळीवर खुले झाले.नोकरी-व्यवसाय सांभाळत,वर्गविरहित शिक्षण घेण्याकडे कल वाढत असून ज्ञानपूर्ण समाज घडविण्याकडे ऑनलाईन शिक्षण योगदान देत आहेत.
या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ठयामध्ये पूर्णतः ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण,तज्ज्ञ मार्गदर्शकांचे ऑनलाईन मार्गदर्शन,रेकॉर्डेड व्हिडिओद्वारे अभ्यासाची सोय,दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य,ऑनलाईन अध्ययन संदर्भात तत्पर शंका समाधान आणि प्रवेश परीक्षा नाही. सुसज्ज अशी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम,कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या नियमित व दूरशिक्षण एम.बी.ए.पदवीशी समकक्ष पदवी,ऑनलाईन तोंडी परीक्षा,चर्चात्मक अध्ययन,विशेष मार्गदर्शन,विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार प्रकल्प मार्गदर्शक निवडीची सोय आणि विद्यापीठाचा स्वतःचा प्लेसमेंट विभाग आहे.महिला,अपंग, ट्रान्सजेंडर तसेच शिवाजी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालय कर्मचारी व त्यांच्या पल्ल्यांना प्रवेश शुल्कामध्ये १० टक्के सवलत देण्यात येते.
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशन बँक कर्मचाऱ्यांना प्रवेश शुल्कामध्ये १० टक्के सवलत आहे. तसेच खेळाडूंनाही प्रवेश शुल्कामध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे पूर्णतः ऑनलाईन परीक्षा पद्धतीचा समावेश होतो. असा वैशिष्ठयपूर्ण अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध करून देणारे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील प्रथम सार्वजनिक विद्यापीठ ठरले आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.तसेच मार्केटिंग,डिजिटल मार्केटिंग,बँकिंग,अकॉउंटिंग,सल्ला-मार्गदर्शन, उत्पादन व वितरण अशा क्षेत्रात आपले करिअर घडविता येते.शिवाय ई - आशय विकसन आणि अध्ययन- अध्यापन क्षेत्राकडे जाता येऊ शकते. कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेशास पात्र असून या अभ्यासक्रमाद्वारे संवाद,मार्केटिंग, सहकार्य, व्यवस्थापन, संघटन, लेखन व आंतरक्रियात्मक कौशल्यांना वाव मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात महत्वाचे योगदान देणारा हा अभ्यासक्रम ठरणार आहे. जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल युगामध्ये ऑनलाईन एम.बी.ए.करीयरच्या दृष्टीने करणे महत्वाचे ठरत असून त्यासाठी पुढील लिंक https://docs.google.com/forms/d/1_bpdSE14B0aK07ymwRYkbztN7kNZ3clUoOWie_x7XpI/viewform?edit_requested=true वर नावनोंदणी करावी आणि ०२३१ - २६०९४०९ क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच ऑनलाईन एम.कॉम. व ऑनलाईन एम.एस्सी (गणित) अभ्यासक्रम सुरु झाले आहेत.