सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक
schedule05 Nov 26 person by visibility 45 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील महाविद्यालय तसेच विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक पद भरतीसाठी नेट सेट हीच अर्हता असल्याबाबतचे स्पष्टीकरण राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून २०२३ च्या अधिसुचनेच्या अनुषंगाने राज्याने दिनांक ५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय करुन राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट किंवा सेट असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चार नोव्हेंबर २०२६ रोजी यासंबंधीचा आदेश काढला आहे.
तथापि या आदेशाबाबत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये तसेच सहसंचालक कार्यालयांकडे संभ्रम होता, म्हणून राज्याच्या संचालकांनी याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे ऑगस्ट २०२६ मध्ये स्पष्टीकरण मागितले होते. त्याच अनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने स्पष्टीकरण देऊन नेट किंवा सेट हीच किमान अर्हता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिनांक ५ मार्च २०२४ पासून नेट किंवा सेट ही अर्हता नसताना केवळ पीएच. डी. पदवीच्या आधारे नियुक्त्या झाल्या आहेत. त्या प्राध्यापकांना आता नेट, सेट उत्तीर्ण होणे आवश्यक असणार का यासंबंधी उच्च शिक्षण विभाग काय धोरण ठरविते याकडे लक्ष लागले आहे.