
सुटाकडून तीनही जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : नोव्हेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. प्रशासकीय पातळीबरोबरच निवडणुका लढविणाऱ्या संघटनांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीची मंगळवारी (२७ सप्टेंबर) बैठक होत आहे. या बैठकीला विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह सिनेट, मॅनेजमेंट, अकेडमीकमधील विकास आघाडीच्या सदस्यांनाही बैठकीला उपस्थित राहण्याविषयी कळविले आहे. मंगळवारी होणारी बैठक प्राथमिक असली तरी सिनेटसह अन्य अधिकार मंडळाच्या निवडणुकीसंबंधी चर्चा होणार आहे.
गेली अनेक वर्षे सिनेट निवडणुकीत विकास आघाडीचे वर्चस्व आहे. संस्थाचालक, प्राचार्य संघटना, विवेकानंद व रयत शिक्षण संस्था, विद्यापीठ विकास मंच अशी एकत्रित निवडणूक लढवितात.
पदवीधर मतदारसंघातून दहा जागा आहेत. यासाठी मोठया संख्येने सभासद नोंदणी झाली आहे. प्राध्यापकांच्या दहा जागा, प्राचार्यांच्या दहा जागा, संस्थाचालक सहा जागा आहेत. पदवीधरमध्ये दहापैकी दहा जागा विकास आघाडीने जिंकल्या होत्या. या दहा जागेमध्ये विकास आघाडीचे सहा उमेदवार तर विद्यापीठ विकास मंचचे चार उमेदवार निवडून आले होते. प्राध्यापक गटातीलदहापैकी आठ जागा शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) जिंकल्या होत्या. प्राध्यापक गटात विकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. अकेडमिकवर विकास आघाडी व सुटा या दोघांचे बलाबल होते.
यंदा विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सिनेट निवडणुकीसाठी विद्यापीठाशी निगडीत सगळया संघटना सक्रिय झाल्या आहेत. सुटा संघटनेने सिनेटमधील प्राध्यापकांच्या दहा जागा व अकेडमिकसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हानिहाय मुलाखती झाल्या.
दुसरीकडे शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीची मंगळवारी बैठक होत आहे. संस्थाचालक, प्राचार्य संघटना, विद्यापीठ विकास मंच यांच्यासह विकास आघाडीशी निगडीत सगळया घटक प्रतिनिधींना बैठकीला आमंत्रित केले आहे. या बैठकीत विद्यापीठीय निवडणुकीसंबंधी विकास आघाडीचे धोरण ठरण्याची चिन्हे आहेत.