शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात कोल्हापूरचा झेंडा, आठ खेळाडूंना पुरस्कार
schedule03 Oct 24 person by visibility 571 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : विविध खेळ प्रकारातील कोल्हापूरच्या खेळाडूंचे कौशल्य आणि विविध पातळीवरील दमदार कामगिरीचा गौरव महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांनी केला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०२२-२३ या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा गुरुवारी (३ ऑक्टोबर २०२४) केली आहे. या क्रीडा पुरस्कारात कोल्हापूर आणि परिसरातील आठ खेळाडू आहेत. साहसी, सायकलिंग, कुस्ती, रग्बी या खेळ प्रकारातील कामगिरीचा सन्मान हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांनी केला आहे. या पुरस्कारांनी क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरची मान आणखी उंचावली.
कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकरला शिवछत्रपती साहसी राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. कस्तुरी सावेकरने वयाच्या २२ वर्षी जगातील सर्वात उंच समजले जाणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. मे २०२२ रोजी आठ हजार ८४८ मीटरहून अधिक उंचीचे शिखर सर करत तिरंगा फडकाविला होता. एव्हरेस्ट सर करणारी ती कोल्हापूरची पहिली कन्या आहे. सावेकर ही श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची खेळाडू आहे.
येथील न्यू कॉलेजमधील खेळाडूंनी पुरस्काराची हॅटट्रिक साधली आहे. न्यू कॉलेजच्य तीन खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. न्यू कॉलेजचे विद्यार्थी व रग्बी खेळाडू वैष्णवी दत्तात्रय पाटील, श्रीधर श्रीकांत निगडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग अंतर्गत न्यू कॉलेजचा विद्यार्थी व दिव्यांग जलतरणपटू अफ्रीद मुख्तार अत्तारला पुरस्कार मिळाला आहे. हे तिघेही खेळाडू सध्या न्यू कॉलेजमध्ये शिकत आहेत.
कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी व राष्ट्रीय सायकलपटू प्रतीक संजय पाटील या खेळाडूला सायकलिंगमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. कोल्हापूरचा शाहू तुषार मानेला नेमबाजीमध्ये तर अॅथलेटिक्सपटू अन्नपूर्णा सुनील कांबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला. कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या नंदिनी बाजीराव साळोखेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान सांगली येथींल गिरीश वैभव जकातेला तलवारबाजीमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे कौतुक होत आहे. दरम्यान न्यू कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक अमर सासने म्हणाले, "खूप अभिमानाची गोष्ट आहे संस्थेसाठी यापूर्वी सुध्दा बऱ्याच खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे क्रीडा क्षेत्रातील यशाची तीच परंपरा या तीन खेळाडूंच्यामुळे पुढे चालू राहिली आहे" न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही एम पाटील यांनीही पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे कौतुक केले आहे. खेळाडूच्या कामगिरीचा कॉलेजला अभिमान आहे. न्यू कॉलेजची क्रीडा क्षेत्राची परंपरा यापुढेही कायम अशीच दिमाखात चालू राहील अशा भावना प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केल्या.