हातकणंगलेत मीच, उमेदवार बदलाची बातमी म्हणजे एप्रिल फूलचा प्रकार-धैर्यशील माने
schedule02 Apr 24 person by visibility 265 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार बदलणार ही बातमी म्हणजे एप्रिल फूलचा प्रकार आहे. माझ्या उमेदवारीत आता कोणताही बदल नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून मी साऱ्यांना आश्वस्त करतो. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.’अशी स्पष्ट भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
खासदार माने यांची उमेदवारी बदलणार अशी चर्चा एक एप्रिल रोजी सर्वत्र पसरली होती. त्या अनुषंगाने खासदार माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मीच आहे. महायुतीशी संब्ंधित सगळया पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या साऱ्याच पक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारी विषयी कसलाही संभ्रम नाही. ’
खासदार माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला. माने म्हणाले, ‘राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी उंबरे झिजवत आहेत. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान नाही. संघटनेच्या नावात स्वाभिमान केवळ नावापुरता शिल्लक आहे. शेट्टी हे कधीही एखाद्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत. प्रत्येकवेळी ते नवीन गोष्टी करत असतात. मतदारसंघातील नागरिकांना ते माहित आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. संघटनेचे नाव स्वाभिमानी ठेवली म्हणून कोणी स्वाभिमानी होत नाही. स्वाभिमानाने वागावे लागते. मात्र शेट्टी हे स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत.’