लघु-मध्यम स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहित केल्यास नवीन उद्योजक घडतील – माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू
schedule14 Jan 26 person by visibility 19 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर आणि परिसरात पूर्वीपासून औद्योगिक क्षेत्राला पोषक वातावरण आहे. कोल्हापूरच्या फौंन्ड्री उद्योगाची ख्याती तर देशभर आहे. त्यासोबतच आता मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि कोल्हापूर -सांगली- सातारा टुरिझम सर्किट विकसित केल्यास येथील उद्योग व्यवसायाच्या कक्षा आणखी रुंदावतील. महत्वाचे म्हणजे या उद्योग व्यवसायाशी निगडीत लघु आणि मध्यम स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहित केल्यास नवीन उद्योजक घडतील.’ असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
‘शाश्वत आणि सर्वांगिण विकास’ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून कोल्हापूर फर्स्ट या संस्थेतर्फे कोल्हापुरातील उद्योजक, कारखानदार यांच्यासोबत मुक्त संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार अशोकराव माने, कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, बाळ पाटणकर, डॉ. अमोल कोडोलीकर, अॅड. सर्जेराव खोत, प्रताप पाटील व्यासपीठावर होते. हॉटेल पॅव्हेलियन येथे मंगळवारी, (तेरा जानेवारी २०२६) सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
माजी केंद्रीयमंत्री प्रभू यांनी, ‘कोल्हापूर फर्स्ट’या संस्थेने शहराच्या शाश्वत विकासासाठी ज्या विविध प्रकल्पावर काम सुरू केले आहे, ते निश्चितच उल्लेखनीय आहे. उद्योजक, कारखानदारांशी संवाद साधताना कोल्हापूर ब्रँडिंगसाठी आता डिजीटल कॅँम्पेनवर फोकस ठेवला पाहिजे. जेणेकरुन विकासासाठी, गुंतवणुकीसाठी ‘कोल्हापूर फर्स्ट…’सर्वत्र पसरेल. कोल्हापुरात मोठया उद्योग व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी देशातील बडया उद्योगपतींना भेटण्यासाठ मी पुढाकार घेऊन. मोठ्या प्रकल्पाच्या गुंतवणुकीला प्राधान्य देतानाच स्मॉल आणि मिडीयम स्केल इंडस्ट्रीजला प्रोत्साहित करण्याचे धोरण अंगिकारवे. जेणेकरुन नवीन उद्योजक घडतील, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ’
‘आयटी पार्कमुळे शहराच्या विकासाला गती मिळते. आयटी पार्क विकसित करताना भविष्यकालीन दृष्टी ठेवून अद्ययावत डेटा सेंटर निर्माण केले पाहिजे.एआयमधील संधी शोधल्या पाहिजेत.’असे प्रभू यांनी नमूद केले. याप्रसंगी प्रभू यांनी कोल्हापूर –वैभववाडी, कराड-चिपळूण रेल्वेमार्ग हे नवीन विकासाचे मार्ग ठरणार आहेत. आपल्या रेल्वेमंत्रीपदाच्य कारकिर्दीत कोल्हापूर –वैभववाडी प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी भाषणात सांगितले.
कोल्हापूर फर्स्टचे समन्यवक सुरेंद्र जैन यांनी, ‘कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. विविध विकास प्रकल्पावर काम सुरू आहे. ‘राज्यकर्ते, प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि लोकसहभाग’या चार घटकांना सामावून घेत कोल्हापूरचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत.असे नमूद केले. याप्रसंगी कारखानदार सचिन शिरगावकर, श्रीकांत दुधाणे, कैलास मेढे, शांताराम सुर्वे, विश्वजीत देसाई, गिरीश वझे, मिलिंद आळवेकर यांनी कोल्हापुरातील फाऊंड्री क्षेत्र, आयटीपार्क, मेडिकल हब, टुरिझम सर्किट या क्षेत्रातील भविष्यकालीन संधी, नियोजन या अनुषंगाने चर्चा केली. इंजिनीअरिंग असोसिएशनचे कमलाकांत कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुराज इंगळे, उज्ज्वल नागेशकर, सचिन शानभाग, जयदीप चौगुले, मोहन कुशिरे, हरिश्चंद्र धोत्रे, पद्मसिंह पाटील, बाबासाहेब कोंडेकर, डॉ. विश्वनाथ मगदूम, विजय कोंडेकर, तुषार कुलकर्णी, डॉ. अण्णासाहेब गुरव, विनोद कांबोज, राजू माने, सीएस जयदीप पाटील,स्वप्नील पाटोळे, प्रवीण निंगनुरे, सचिन बीडकर, विकास जगताप, आदी उपस्थित होते. एनकेजीएसबी बँकेचे अधिकारी गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला.