जिल्हा परिषदेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान ! मतमोजणी सात फेब्रुवारीला !!
schedule13 Jan 26 person by visibility 243 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली.
या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पन्नास टक्केपेक्षा कमी आरक्षण मर्यादा ज्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांत आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील. फेब्रुवारी रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी १६ ते २१ जानेवारी २०२६ आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी आहे. उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी आहे. उमेदवारांची अंतिम यादी २७ जानेवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदाराला दोन मते देता येणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेसाठी व एक मत पंचायत समितीसाठी असणार आहे. या निवडणुकीसाठी एक जुलै 2025 ची मतदार यादी वापरता येणार आहे. 25 हजार 482 मतदान केंद्रावर मतदान होईल. मतदानाच्या 24 तास आधी प्रचार संपवावा लागणार आहे. बारा जिल्हा परिषद साठी 737 सदस्य निवडण्यात येणार आहेत. 125 पंचायत समितीसाठी १४६२ सदस्य निवडण्यात येणार आहेत.