भारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
schedule05 Aug 26 person by visibility 8 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची बुधवारी, पाच ऑगस्ट २०२६ रोजी बैठक झाली. भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीत नवीन कामगार कायदे (लेबर कोड): बैठकीत भारतीय मजदूर संघाची लेबर कोडविषयीची भूमिका सविस्तरपणे मांडण्यात आली. या लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द कराव्यात आणि जे कामगार या कायद्याच्या कक्षेतून बाहेर जात आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा अशी विनंती करण्यत आली. तसेच राज्यात कामगार राज्य विमा योजना अत्यंत प्रभावीपणे राबवावी. बोनस मर्यादा वाढवून ४२,००० रुपये करावी. राज्य सरकार अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा. कामगार कपात नुकसान भरपाई ६० दिवस करावी. ईपीएस पेन्शनधारकांना २,००० रुपये पेन्शन देण्यात यावी. विश्वकर्मा जयंती अधिकृतपणे शासकीय सण म्हणून घोषित करावी. विडी कामगारांना किमान वेतन या मागण्या करण्यात अल्या.या मगण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. बैठकीस भारतीय मजदूर संघाच्या वतीने अखिल भारतीय सेक्रेटरी ॲड. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगिर, विदर्भ महामंत्री गजानन गटलेवार आणि सह क्षेत्र संघटनमंत्री मोहन येणुरे हे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महेश पोहणेरकर उपस्थित होते.