चिन्मय अमृत यात्रा गुरुवारी कोल्हापूर शहरात
schedule10 Feb 26 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चिन्मय मिशनच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षानिमित्त 'चिन्मय अमृत यात्रा'या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. चिन्मय अमृत यात्रा गुरुवारी, बारा फेब्रुवारी २०२६ रोजी कोल्हापुरात दाखल होत आहे. 'जनसेवा हीच ईश्वर सेवा ' या उद्देशाने प्रेरित होऊन देशभरातील दहा लाख युवकांना स्वामी चिन्मयानंद यांनी राष्ट्रासाठी केलेल्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ओळख करून देणे हा या यात्रेमागचा उद्देश आहे. असे चिन्मय मिशन कोल्हापूरचे प्रभारी स्वामी दत्तराजानंद यांनी सांगितले.
ही यात्रा कोल्हापूर शहरांमध्ये सकाळी साडेनऊ वाजता, जनता बाजार चौक येथे येणार आहे. आयपीएस अधिकारी दीपक पांडे, चिन्मय मिशनचे कार्यकर्ते हे स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. तिथून ही शोभायात्रा श्रीराम विद्यालय राजारामपुरी मार्गे चिन्मय पुष्पांजलीपर्यंत सकाळी साडेदहा पर्यंत येईल. शोभायात्रेनंतर सकाळी साडेअकरा वाजता देशभक्त रत्नप्पान्ना कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे चिन्मय मिशन युवा केंद्राचे प्रमुख स्वामी अनुकूलानंद व स्वामी प्रत्ययानंद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. संध्याकाळी साडेसहा वाजता चिन्मय पुष्पांजली प्रतिभानगर येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला चिन्मय मिशनच्या कार्यावर पंधरा मिनिटांची एक चित्रफित दाखवली जाईल. त्यानंतर आयपीएस अधिकारी दीपक पांडे आयपीएस, हे 'चिन्मय मिशन - एक प्रेरणा ' या विषयावर व्याख्यान देतील. या पत्रकार परिषदेस स्नेहल कारंडे, प्रा.विलास गंभीरे, अभय मगदूम आदी उपस्थित होते.