बालगोपालचा दिमाखदार विजय, सोल्जर ग्रुपचा पराभव
schedule25 May 23 person by visibility 372 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने सोल्जर ग्रुपच्या ६-० असा धुव्वा उडविला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली आहे.
बालगोपाल आणि सोल्जर यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात बालगोपालने सामन्यावर एकतर्फी वर्चस्व ठेवले. पूर्वार्धात छत्तीसाव्या मिनिटाला ऋतुराज पाटील याने मैदानी गोल करत संघाचे खाते खोलले. त्यानंतर ३९ व्या मिनिटाला जिबोलो याने सफाईदार गोलची नोंद केली. मध्यंतरास बालगोपाल संघ २-० असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात ही बालगोपालचा धडाका कायम होता. ४६ मिनिटाला अभिनव साळोखे याने मैदानी गोल केला. ५८ आणि ६१ व्या मिनिटाला जिबोलो याने सलग दोन करत सामन्यात हॅट्रीक नोंदवली. ७६ व्या मिनिटाला अक्षय सरनाईकने गोल नोंदवत बालगोपालला ६-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत टिकवत बालगोपालने सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. बालगोपालच्या जिबोलो सामनावीर तर सोल्जर ग्रुपच्या स्वप्नील पाटील यांची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
शुक्रवारचा सामना ,
संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स, दुपारी चार वाजता.