भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक
schedule30 May 23 person by visibility 671 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक यांची भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालील महिला पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. महाडिक या अभ्यासू लोकप्रतिनिधी व प्रभावी वक्त्या म्हणून ओळखल्या जातात.
शौमिका महाडिक यांनी मागील तीन वर्षे भाजप महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. राज्य कार्यकारिणीत कोल्हापुरातून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबतची घोषणा केली.
आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नामोहरम करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी कोल्हापूरच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्यातील धडाडीच्या महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. गोकुळमध्येही त्या विरोधकाची भूमिका जबाबदारीने पार पाडत आहेत. नुकत्याच झालेल्या राजाराम कारखाना निवडणुकीत महाडिक यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना विरोधक निरुत्तर झाल्याचे चित्र होते. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. जिल्हा परिषद सदस्या व अध्यक्षा म्हणून त्यांनी छाप पाडली आहे.