राजर्षी शाहू अध्यासनातर्फे ११ उपक्रमाद्वारे शाहू विचारांचा जागर
schedule19 Jun 24 person by visibility 314 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :* लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा आणि विचारांचा जागर करण्याचा निर्धार राजोपाध्येनगर परिसरातील कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजर्षी शाहू अध्यासनाच्या बैठकीत करण्यात आला.
यासंबंधी माहिती देताना अध्यासनाचे संस्थापक प्राचार्य डाॅ. जे. के. पवार म्हणाले, " लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभरामध्ये विविध प्रकारच्या अकरा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहूंसंबंधित वाङ् मयावर चर्चासत्र, शाळा महाविद्यालयांमध्ये १५१ व्याख्यानांचे आयोजन, निबंध स्पर्धा, ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रफीत बनविण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, राजर्षी शाहू विचार लेखन उपक्रम, काव्यलेखन स्पर्धा, राजर्षी शाहूंच्या १६ भाषणांचे एकाचवेळी वाचन याचबरोबर राजर्षी शाहूंविषयी ग्रंथांना 'राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार' आदी उपक्रमांचा समावेश असणार आहे."
विशेष म्हणजे अध्यासनाच्या वतीने राजर्षी शाहूंचे कार्य व विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पुस्तकांसह राजर्षी शाहूंचे संक्षिप्त चरित्रदर्शन याचेही लेखन व प्रकाशन अध्यासनातर्फे करणार असल्याची माहिती अध्यासनाचे संचालक प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी दिली.
राजर्षी शाहूंच्या जीवन-कार्यावर आधारित २०५ ग्रंथ अध्यासनामध्ये उपलब्ध आहेत. शाहू प्रेमी आणि अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालिका श्रद्धा दिग्विजय पवार यांनी केले आहे. बैठकीस मंत्रालयीन कक्ष अधिकारी राजकुंवर डफळे-पवार, प्राचार्य अवधूत पाटील, प्रा. पंकज शिंदे आदी उपस्थित होते. राजर्षी शाहूंच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने अध्यासनातर्फे करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले.