साथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजली
schedule04 Aug 26 person by visibility 58 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या ‘आझादी की जंग’ या ऐतिहासिक नृत्यनाटिकेतील कलाकारांनी तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कलापथकाचे मार्गदर्शक आणि संघटक दिवंगत भरत लाटकर यांच्या निधनानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकार आणि सेवा दल सैनिकांनी सांताक्रुझ येथील 'साने गुरुजी आरोग्य मंदिर' येथे एकत्र जमून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
स्वातंत्र्यलढ्याचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने ‘आझादी की जंग’ या नृत्यनाटिकेची निर्मिती केली होती. वसंत बापट लिखित व सुधा वर्दे दिग्दर्शित आणि प्रसिद्ध नृत्यांगना झेलम परांजपे यांच्या नृत्य दिग्दर्शनाने सजलेल्या या महानाट्याचे संपूर्ण भारतात १०० हून अधिक प्रयोग झाले होते. या ऐतिहासिक कलापथकात कोल्हापूरच्या २२ कलाकारांसह महाराष्ट्रातील एकूण ६० कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला होता. या सर्व कलाकारांना एकत्र आणण्यात आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात भरत लाटकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पेरलेल्या राष्ट्रभक्तीच्या आणि कलेच्या संस्कारांमुळे सर्व कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले. या पुनर्मिलन सोहळ्यात कलाकारांनी आपल्या जुन्या प्रयोगांच्या, प्रवासाच्या आणि लाटकर काकांच्या मार्गदर्शनाच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे वातावरण कमालीचे भावनिक झाले होते.
या कार्यक्रमाला ‘आझादी की जंग’ मधील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे निष्ठावान सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन झेलम परांजपे, डॉ.प्रविण कोडोलीकर, दीपक नानचे आणि यशवंत पाटील यांनी केले होते. यावेळी युवराज मोहिते ,आनंद लांबोरे ,उमर घाटगे,सुलक्षणा म्हात्रे, संध्या देवडकर स्मिता पाटील ,नितीन आर्य, अमोल म्हात्रे, रोहन डहाळे, प्रकाश मडकईकर ,अभिजीत जोशी, नरेश पाटील ,रवी पाटील, शिल्पा पोवार, दीपा खरात उपस्थित होते.