अर्जेंटिना फुटबॉल विश्वचषकाचा जगज्जेता ! अंतिम सामन्यात फ्रान्सवर विजय
schedule18 Dec 22 person by visibility 995 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज 1 : जगभरातील फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या कतार येथील फुटबॉल विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटवर अर्जेंटिना संघाने फ्रान्स संघावर चार विरुद्ध दोन गोलफरकाने विजय मिळवत जगज्जेता बनला. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बाजी कोण मारणार याकडे साऱ्यांच्या लक्ष लागून होते. अंतिम सामन्यात दोन्ही संघाने जबरदस्त खेळ करत जगभरातील फुटबॉल शौकिनांची वाहवा मिळवली. हा सामना कमालीचा उत्कंठावर्धक झाला. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात साऱ्यांच्या नजरा अर्जेंटिना संघाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी व फ्रान्सचा खेळाडू एमबापे या खेळाडूवर खिळल्या होत्या. पूर्वार्धात अर्जेंटिना संघ दोन विरुद्ध शून्य गोल फरकाने आघाडीवर होता. सामन्याच्या 22 व्या मिनिटाला अर्जेंटिना संघाला पेनल्टी मिळाली. त्यावर मेसीने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिना संघाने आघाडी घेताच समर्थकांनी सारे मैदान दुमदुमून सोडले.
सामना संपण्यास दहा मिनिटांचा अवधी असताना फ्रान्स संघाने दोन मिनिटांच्या अंतराने लागोपाठ दोन गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. फ्रान्स संघाचा स्टार खेळाडू एमबापेने गोल करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. फ्रान्सच्या संघाने सामन्यात बरोबरी साधताच अर्जेंटिना संघाच्या पाठीराख्यामध्ये कमालीची शांतता पसरली. फ्रान्सच्या चाहत्याने जल्लोष केला. उर्वरित वेळेत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमणावर भर दिला. विजय मिळवून देण्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केले. पूर्ण वेळेत हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. ज्यादा वेळेत अर्जेंटिना संघाने गोल करत आघाडी ३-२ अशी वाढवली. मेस्सीचा हा अंतिम सामन्यातील दुसरा गोल होता. मात्र ही आघाडी फार काळ टिकली नाही. सामन्याच्या 118 मिनिटाला फ्रान्सच्या एमबापेने गोल करत सामना ३-३ करत सामना बरोबरीत आणला. एमबापेने जिगरबाज खेळ करत तीन गोल केले.अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटवर झाला. यामध्ये बाजी मारत अर्जेंटिना संघाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला.१९७८, १९८४ आणि २०२२ अशा तीन वेळेला अर्जेंटिना संघ विजेता ठरला. वर्ल्ड कप जिंकण्याचे मेस्सीचे स्वप्न ही साकार झाले.