एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
schedule07 Mar 23 person by visibility 805 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
एस.टी. चालकाला शिविगाळ करुन मारहाण करणाऱ्या आरोपी प्रविण जयराम शिलवंत (वय २७, रा. माळी मळा, सरनोबतवाडी, ता. करवीर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. जगताप यांनी एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. अॅड. पी.जे. जाधव यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
या खटल्याची माहिती अशी की २३ जानेवारी २००२० रोजी एसटी चालक सागर सदानंद कोलते (रा. सर्वेश पार्क, फुलेवाडी) हे कोल्हापूर हुपरी रस्त्यांवर एसटीतून प्रवासी वाहतूक करत होते. उचगाव येथील हॉटेल सात बाराच्या परिसरात आरोपी मोटार सायकलला एसटी घासूनही थांबवली नाहीस म्हणून आरोपी प्रविण शिलवंत याने एसटी चालक कोलते यांना एसटी का थांबवली नाही म्हणून शिविगाळ करुन मारहाण केली. तसेच एसटीच्या काचाही फोडल्या. चालक कोलते यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रविण शिलवंत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या गुन्ह्याचा तपास करुन कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
सत्र न्यायाधीश जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील प्रतिभा जयकर जाधव यांनी नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी, प्रत्यक्ष पुरावा आणि सरकारी वकील जाधव यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून कोर्टाने आरोपी प्रविण शिलवंत याला एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.