टेनिस स्पर्धेत दुहेरीत आकृती सोनकुसरे, ऐश्वर्या जाधव जोडी उपांत्य फेरीत
schedule25 May 23 person by visibility 189 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने व डीवाय पाटील पुरस्कृत १८ व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी व महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदे यांनी मानांकीत खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली. दुहेरी गटात महाराष्ट्राची आकृती सोनकुसरे, ऐश्वर्या जाधव या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेरी वेदर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, येथे सूरू असलेल्या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपुर्व फेरी मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत समर्थ सहिताने गुजरातच्या दहाव्या मानांकीत पंशुल उबोवेजाचा 6-1, 6-2 असा तर अर्णव पापरकरने कर्नाटकच्या श्रीनिकेत कन्नन याचा 6-2, 6-1 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या दुस-या मानांकीत आराध्या क्षितिजने उत्तरखंडच्या नवव्या मानांकीत अर्णव यादवचा 6-3, 3-6, 6-1 असा पराभव केला. मुलींच्या गटात कर्नाटकच्या बिगर मानांकीत साई जान्वी टी हीने दिल्लीच्या पाचव्या मानांकीत याशिका शोकीनचा 6-2, 6-4 असा तर महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत प्रिशा शिंदेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सहाव्या मानांकीत ऐश्वर्या जाधवचा 7-5, 3-6, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत मुलांच्या गटात दिल्लीच्या प्रणील शर्माने हरयाणाच्या आदित्य मोरच्या साथीत उत्तरखंडच्या अर्णव यादव व हरयाणाच्या अर्जुन राठी या दुस-या मानांकीत जोडीचा 7-6(2), 3-6, 10-7 असा तर कर्नाटकच्या आराध्या क्षितिज व श्रीनिकेत कन्नन या बिगर मानांकीत जोडीने तमिळनाडूच्या व्ही थिरुमुरुगन व कर्नाटकच्या श्रीकर डोनी या चौथ्या मानांकीत जोडीचा 6-7(5), 7-6(2), 10-8 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तेराव्या मानांकित नैनिका रेड्डी बेंद्रमने दिल्लीच्या सातव्या मानांकित दिव्या उंग्रीशचा 6-2, 6-4 असा पराभव अनपेक्षित निकाल नोंदवला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे व ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र) या अव्वल मानांकीत जोडीने महाराष्ट्राच्या देवांशी प्रभुदेसाई व गुजरातच्या जान्वी आसावा यांचा 6-4, 7-5 असा तर महाराष्ट्राच्या नानिका बेंद्रम व सेजल भुतडा या दुस-या मानांकीत जोडीने तेलंगणाच्या वेनेला रेड्डी गारुगुपती व मध्य प्रदेशच्या पहेल खराडकर यांचा 6-3, 6-1 असा पराभव केला. ओडिशाच्या सोहिनी मोहंतीने कर्नाटकच्या हरिशिनी एन हीच्या साथीत तमिळनाडूच्या सविता भुवनेश्वरन व दिया रमेश या चौथ्या मानांकीत जोडीचा 6-2, 6-2 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.