कोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !!
schedule27 Sep 23 person by visibility 2106 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारी शाळांचे खासगीकरण, नोकर भरतीचे कंत्राटीकरण, शिक्षकांवर लादण्यात येणारी अशैक्षणिक कामे याविरोधात कोल्हापुरात शनिवारी (३० सप्टेंबर २०२३) २५ हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधातील या आंदोलनात पालक, विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील,पालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. जी. बोराडे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत मोर्चाची माहिती दिली.
आमदार आसगावकर म्हणाले, ‘सरकारचे धोरण हे शिक्षण क्षेत्राला धक्का पोहचविणारे आहे. शाळा मोडीत काढण्याचा उद्योग सुरू आहे. या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात साऱ्यांनी सहभागी व्हावे.’ दादासाहेब लाड म्हणाले, ‘तीस सप्टेंबरचा मोर्चा हा मुलांच्या भवितव्यासाठी आहे. शाळा टिकल्या तर सामान्य कुटुंबांतील मुले शिकतील. सरकारला शाळांचे खासगीकरण, कंत्राटीकरणाचे निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.’शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड म्हणाले, ‘या आंदोलनात केजी टू पीजीपर्यंतच्या सर्व घटकांचा सहभाग असणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज, सिनीअर कॉलेजमधील शिक्षक, पालकांचा सहभाग असणार आहे.’ शनिवारी दुपारी १२.३० वाजता टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात होईल. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे.
कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शाळा कृती समितीचे बाबा पाटील, राज्य डीएड सेवक संघटनेचे खजानिस प्राचार्य पी. एस. हेरवाडे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, मुख्याध्यापक संघाचे व्हाईस चेअरमन मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, संस्था चालक संघाचे शिवाजी माळकर, माजी मुख्याध्यापक आर. डी. पाटील, एस. व्ही. सुर्यवंशी, शिक्षक संघ थोरात गटाचे साहेबराव शेख, बाजीराव कांबळे, श्वेता खांडेकर, दिलीप माने, शिक्षक परिषदेचे उदय पाटील,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सुरेश खोत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सी. एम. गायकवाड, शिक्षकेत्तर सेवक संघटनेचे मनोहर जाधव, महापालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, दिलीप माने, पुरोगामी शिक्षक संघटनेचे विलास पिंगळे, द्रोणाचार्य पाटील, शिक्षक समितीचे प्रमोद तौंदकर, सुधाकर सावंत, उमेश देसाई, शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सुधाकर निर्मळे, शिक्षण संघर्ष संघटनेचे श्रीधर गोंधळी, चतुर्थश्रेणी संघटनेचे शिवाजी वरपे आदी उपस्थित होते.
……………..
थोरात गट होणार तीस सप्टेंबरच्या मोर्चात सहभागी
शिक्षक संघ थोरात गटातर्फे खासगीकरण, कंत्राटीकरणसह अन्य शैक्षणिक प्रश्नांसंबंधी दोन ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. दरम्यान शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील यांच्याशी संपर्क साधला. शाळा व शिक्षकांच्या हक्कासाठी आपण लढत आहोत एकाच विषयासाठी दोन मोर्चा काढण्याऐवजी एकच मोर्चा काढू या अशी चर्चा केली. आमदार जयंत आसगावकर यांनीही शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्याशी यासंबंधी चर्चा केली. यामुळे थोरात गटाने दोन ऑक्टोबरचा मोर्चा रद्द करुन तीस सप्टेंबरच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर दोन्ही पाटील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्यासंबंधीचे पत्रही लाड यांच्याकडे दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षक संघ थोरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. वाय. पाटील, शिक्षक नेते मामा भोसले, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, विलास चौगले आदी उपस्थित होते. थोरात गटातर्फे दोन ऑक्टोबरचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. संघाचे पदाधिकारी, शिक्षक तीस सप्टेंबरच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.