गणवेश बिलासाठी ८० हजाराचा डल्ला, महामंडळाच्या समन्वयकासह दोघे पोलिसांच्या जाळयात
schedule06 Oct 24 person by visibility 176 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाळांना गणवेश पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटाचे बिल काढण्यासाठी ८० हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा समन्वयक सचिन सीताराम कांबळे व सहायक नियंत्रक उमेश लिंगनूरकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणी ८० हजाराची लाच घेताना लिंगनूरकर यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय नागाळा पार्क येथे आहे. जिल्हा परिषद शाळांना गणवेश गणवेश पुरवठा करण्याचे काम या कार्यालयाकडे आहे. या महामंडळातंर्गत एका बचत गटाला जिल्हा परिषदेच्या १९ केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करण्याचा ठेका दिला होता. गणवेश तयार करण्याचे एकूण बिल १८ लाख ३५ हजार ८१४ रुपये आहे. या बिलापैकी १४ लाख ३५ हजार रुपयांचे बिल दिले होते. उर्वरित बिलासाठी बचत गटाकडून महामंडळाकडे पाठपुरावा सुरू होता. त्य बिलासाठी लाचेची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
महामंडळातील सहायक नियंत्रक लिंगनूरकर यांनी उर्वरित बिलासाठी जिल्हा समन्यवक सचिन कांबळे याला ८० रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतरच बिल काढले जाईल. असे सांगितले. तक्रारदारांनी यासंबंधीची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने यासंबंधी पडताळणी करुन पुढील कार्यवाही सुरू केली. सहायक नियंत्रक लिंगनूरकर याला ८० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. लिंगनूरकरने महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळेसाठी रक्कम घेत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी, कांबळेलाही अटक केली. या कारवाईत पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील यांनी सहभाग घेतला.