जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकार
schedule17 Apr 25 person by visibility 321 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मनिषा सतीश कुरणे यांचे अडीच तोळयाचे गंठण चोरट्यांनी लांबविले. गुरुवारी (१७ एप्रिल २०२५) सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कसबा बावडयात हा प्रकार घडला. दुचाकीवरुन चोरटयांनी हिसकावून पोबारा केला. याच दरम्यान शाहू सर्कल परिसरातही सुमन मोरे या महिलेच्या गळयातील गंठण चोरटयांनी लंपास केला. या घटनेने परिसरात एकच घबराट उडाली. शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दिवसाढवळया भर रस्त्यावर चोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी कारवाई करुन वचक निर्माण करावा असे नागरिक म्हणत आहेत.
कुरणे हे कसबा बावडा येथील ओम कॉलनीत राहतात. त्या सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हापूरकडे निघाल्या होत्या. ठोंबरे गल्ली नजीक दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरटयांनी कुरणे यांच्या गळयातील गंठण हिसकावले.कुरणे यांनी आरडाओरड केली. मात्र चोरटे पसार झाले. शाहू सर्कल येथेही सुमन मोरे यांच्या गळयातील गंठण चोरटयांनी लंपास केला. यावेळी झटापटही झाली. त्यामध्ये मोरे या जखमी झाल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.