सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार
schedule12 Oct 26 person by visibility 14 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांच्या कालावधीत सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री होते. तेव्हा ते मुंबईतून गोकुळची सूत्रे हलवित होते. अध्यक्ष कोण करायचे ते मुंबईत ठरत होते.’असा पलटवार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आला. यावेळी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करून सर्व २५ उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. महासैनिक दरबार हॉल येथे हा मेळावा झाला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा जाहीरनामा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा, गोकुळच्या सर्वांगीण विकासाचा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारा दूरदर्शी संकल्पनामा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला, दूध व्यवसायाला बळकटी, पारदर्शक कारभार आणि गोकुळला अधिक सक्षम करण्याची ठोस भूमिका या जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे. महायुतीची भक्कम एकजूट आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर येत्या १८ ऑक्टोबर रोजी कपबशी या चिन्हावर शिक्कामोर्तब करून १९ ऑक्टोबरला महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळू.’
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना उद्देशून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत.’असा इशारा दिला. गोकुळ निवडणुकीचे महायुतीचे निर्णय मुंबईत ठरतात असे सतेज पाटील म्हणतात. त्यांनीही लक्षात ठेवावे, महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना गोकुळचे पॅनेलही मुंबईतच ठरले होते. असा टोला मंत्री पाटील यांनी लगाविला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक , आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे आदी उपस्थित उपस्थित होते.