निवडणुका आल्या की विकासाच्या गप्पा, सत्तेत असताना सतेज पाटील झोपा काढत होते का -चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
schedule03 Jan 26 person by visibility 366 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे निवडणुका आल्या की विकासाच्या बाता मारतात. वास्तवात ते अनेक वर्ष सत्तेत होते. महापालिकेत त्यांची सत्ता होती. आता विकासाच्या गोष्टी करणारे तेव्हा झोपा काढत होते का ?’ अशी बोचरी टीका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने महायुतीचा प्रचार शुभारंभ शनिवारी तीन जानेवारी २०२६ झाला. मिरजकर तिकटी येथे आयोजित या प्रचार शुभारंभाच्या सभेला भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक होते. याप्रसंगी महायुतीच्या प्रचारगीताचे लोकार्पण करण्यात आले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘केंद्रातील आणि राज्यातील सरकारने जनहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. देशाला सुरक्षित ठेवताना सरकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकही सक्षम बनविले. लाडकी बहिण योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा त्यामागील उद्देश आहे. कोल्हापुरात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी महायुती साकारली आहे. निश्चितच महायुतीचा महापौर होणार.’
प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा ऊहापोह करत कोल्हापूरच्या विकासाला आणखी गती द्यायची असेल तर महायुतीचा महापौर करा. कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही. असे नमूद केले. ज्यांच्याकडे सत्ता नाही ते कोल्हापूरचा विकास काय साधणार ? तेव्हा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका महायुतीकडे दत्तक म्हणून द्या. कोल्हापुरात 25 वर्षे टिकतील असे काँक्रीटचे रस्ते करू असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री प्रकाश आबिकटर यांनी, ‘कोल्हापुरात महायुतीतर्फे महापालिका निवडणुका लढविली जातेय हा शुभसंकेत आहे. विधानसभा निवडणूक, नगरपालिकेतील यशासारखी महापालिका निवडणुकीतही होईल. जवळपास ७० नगरसेवक महायुतीचे निवडून येतील. केवळ टिकाटिप्पणी करण्याऐवजी कोल्हापूरच्या विकासाला आपले प्राधान्य आहे. राजकारणाऐवजी विकासकरणावर आपला भर आहे. शहर विकासाचे विविध प्रकल्प मार्गी लावू.’
खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘ प्रशासक पदाच्या अडीच वर्षाच्या कामकाजाचा पंचनामा करतात तुम्ही पंधरा वर्षे सत्तेत होता त्या कामाचा पंचनामा कधी करणार? आमदार पाटील यांनी कोल्हापूरवर दोन मोठे उपकार केले आहेत. एक टोल बसविला होता, आणि दुसरी म्हणजे वारंवार बिघाड होणारी थेट पाइपलाइन योजना. खोटेनाटे बोलायचे, लोकांना फसवायचे हा त्यांचा प्रकार आता कोल्हापूरकरांच्या लक्षात आला आहे’असा टोला महाडिक यांनी लगाविला. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी विधानसभेला महायुतीला विजयी करत काँग्रेसच्या नेत्याची घंटी वाजविली आहे.त्या नेत्यांनी सत्तेचा वापर केवळ स्वतच्या हॉटेल, कॉलेज आणि हॉस्पिटलच्या उत्कर्षासाठी केला. याउलट महायुतीच्या सरकारने सर्किट बेंच सुरू केले, आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटरसंबंधी निर्णय घेतले. कोल्हापूर आता विकासाच्या वाटेवर आहे.’ भाजपचे जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, उमेदवार सत्यजीत जाधव, ओंकार जाधव, विलास वास्कर, रुपाराणी निकम, माधुरी किरण नकाते, स्वरुप कदम, वैभव माने, यशोदा मोहिते, आशकीन आजरेकर , संजय निकम, दीपा अजित ठाणेकर, उपस्थित होते.