वृत्ती खेळाडूची…जिगर समाजसेवेची ! राष्ट्रीय फुटबॉलपटू महापालिकेच्या मैदानात !!
schedule03 Jan 26 person by visibility 97 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर ही क्रीडा पंढरी. कुस्तीसोबतच येथे फुटबॉलचेही वेड. कोल्हापुरातील अनेक फुटबॉलपटूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकदार खेळ केला. यामध्ये राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार संभाजीराव जाधव यांचा समावेश आहे. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजविलेला हा फुटबॉलपटू आता महापालिकेच्या मैदानात उतरला आहे. प्रभाग क्रमांक तेरामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहे. ओंकार जाधव यांच्या माध्यमातून एक तरुण खेळाडू, उमदं नेतृत्व राजकारणात प्रवेश करत आहे.
मंगळवार पेठेतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात जाधव कुटुंबीयांचे योगदान मोठे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिले. चंद्रकांत जाधव यांच्या पश्चात संपूर्ण जाधव कुटुंबीय सामाजिक व अन्य क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे चालवित आहेत. माजी नगरसेवक संभाजीराव जाधव हे मंगळवार पेठेतील साऱ्यांच्या हक्काचे व्यक्तिमत्व. फुटबॉलपटू म्हणून त्यांनी मैदान गाजविले होते. महापालिकेचे मैदानही त्यांनी गाजविले. तीन वेळा नगरसेवक होण्याची हॅट्र्रिक केली. २००५ ते २०२५ पर्यंत अशा तीन सभागृहात त्यांनी प्रतिनिधीत्व केले. विविध पदावर काम केले. स्थायी समिती सभापती, गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारीने काम केले. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. सभागृहात विविध विषयावर आवाज उठविला. मतदारांच्या हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता, नगरसेवक. त्यांनी शाहू मैदान, मंगेशकरनगर, कैलासगडची स्वारी मंदिर अशा विविध प्रभागातून निवडणूक जिंकली. विजयातील या सातत्यावरुन जाधव कुटुंबींय आणि मतदारांतील विश्वास किती भक्कम आहे याचे दर्शन घडते. संभाजीराव जाधव यांचे चिरंजीव ओंकार आता नवी इनिंग सुरू करत आहेत.
जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ते शिवसेनेचे उमेदवार आहेत. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, युवा उद्योजक सत्यजीत जाधव ही सारी मंडळी समाजकारणात सक्रिय. त्यांच्या पाठोपाठ आता ओंकार जाधव हे तोच वारसा पुढे चालविण्यासाठी सरसावले आहेत. गेली तीन, साडेतीन वर्षे ते प्रभागातील लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या कामांची सोडवणूक करत आहे. ओंकार हा मुळात फुटबॉलपटू.विविध स्पर्धेत बहारदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकलेली. खिलाडूवृत्ती अंगी भिनलेली. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची मानसिकता. आता हा तरुण महापालिकेचे मैदान गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रभागातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्या प्रचाराला, संपर्काला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.