उद्धव ठाकरेंची भेट, पण संजय पवारांची नाराजी कायम !
schedule03 Jul 25 person by visibility 26 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुखपद नियुक्तीवरुन नाराजीनाट्यावर तोडगा काढण्यासाठी मातोश्री येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उपनेते संजय पवार यांच्याशी चर्चा झाली. ‘भविष्यात चुका दुरुस्त करू, एकदा निवड जाहीर केल्यावर त्या थांबविता येत नाहीत.’असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र ठाकरे यांची भेट होऊनही पवार यांची नाराजी कायम राहिली आहे.’आपण उपनेतेपदाचा राजीनामा मागे घेणार नाही. मात्र शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कोणत्याही पक्षात जाणार नाही.’असे पवार यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुखपदावर माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर संघटनेतील धुसफूस सामोरी आली. अनेकांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केली. पवार यांनी उपनेतेपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. या साऱ्या घडामोडीनंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे व अन्य पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला बोलाविले होते. बुधवारी, (२ जुलै २०२५) दुपारी ठाकरे यांच्या ‘मातोश्री’निवासस्थानी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, राजू यादव, तानाजी आंग्रे, भीमराव आमते, सतीश पानारी, महिला आघाडीच्या स्मिता सावंत आदी उपस्थित होत्या. ठाकरे यांच्यासोबत पहिल्यांदा पवार व देवणे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर उपस्थित सर्वांची भेट घेतली.