भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे
schedule12 Dec 25 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: भाऊ पाध्ये हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे अनुभववादी, मानवतावादी लेखक होते. समस्त प्रस्थापित मांडणी व संकेतांना छेद देणारे आणि प्रस्थापित चौकटी झुगारून देत जगण्याचे अराजक मांडणारे लेखन हे त्यांच्या समग्र साहित्यव्यववहाराचे वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे पी.एम.-उषा योजनेअंतर्गत साठोत्तरी काळातील अग्रगण्य लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार’ या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्रास आज प्रारंभ झाला. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना प्रा. सप्रे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ कवी, अनुवादक व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.
चंद्रकांत पाटील यांनी भाऊ पाध्ये यांच्या सहवासातील अनेक मैत्रीपूर्ण प्रसंगांना उजाळा देऊन त्यामधून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक अलक्षित पैलू श्रोत्यांसमोर मांडले. ते म्हणाले, लघुनियतकालिक चळवळीला बळ देणारा प्रणेता भाऊ पाध्ये होते. कामगार चळवळीत त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. त्यामुळे येथील अधोसंस्कृतीकडे पाहण्याची त्यांची म्हणून एक वेगळी दृष्टी होती. ती दृष्टी पुढे मनोहर ओक, नामदेव ढसाळ यांच्यात आढळते. नवे लेखक त्यांच्या लेखनापासून, शैलीपासून प्रेरणा घेत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, भाऊ पाध्ये यांनी उघड्या डोळ्यांनी, संवेदनशील मनाने भोवताल टिपला आणि तो जसाच्या तसा लिहीला, म्हणून ते लेखन वाचकांना भिडले. त्यांच्या साहित्यात माणसाचे खरे दर्शन घडते. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. समारंभास डॉ. माया पंडित, डॉ. उदय नारकर, डॉ. श्रीराम पवार, सचिन परब, डॉ. शरद नावरे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. किरण गुरव, अमित नारकर, अवधूत डोंगरे, प्रसाद कुमठेकर उपस्थित होते.