नवा नेता…नवा पक्ष ! वर्षभरात ५० नगरसेवकांचे पक्षांतर ! !
schedule13 Dec 25 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : निवडणुकीची चाहूल लागली की पक्षांतराचे वारे वाहू लागतात. कोल्हापूर महापालिका निवडणूक सुद्धा याला अपवाद राहिली नाही. पाच वर्षानी होत असलेली महापालिका निवडणूक जिंकायचीच या इराद्याने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. इलेक्टिव्ह मेरीटला महत्व देत प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवारांना प्राधान्य देत आहे. त्यांना पक्षात सामावून घेतले जात आहे. तर खोबरं तिकडं चांगभलं म्हणत अनेकजण सत्तेच्या वळचणीला जात आहेत. विधानसभेला नेत्यांनी उमेदवारी डावलली म्हणून कोणी पक्ष बदलला. तर कोण नेत्यांवर नाराज होऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. ना नेते मंडळीवर विश्वास…ना जनतेशी कमिटमेंट…आम्ही करु ते सही राजकारण या धारणेने काही जण राजकारणाकडे पाहतात. निवडणूक म्हटलं की मनी आणि मॅन पॉवर गरजेचे. या दोन्हींवर भिस्त ठेवत अनेक इच्छुकांनी नेते आणि पक्ष निवडले. गेल्या वर्षभरात कोल्हापुरात पन्नासहून अधिक नगरसेवकांनी पक्षांतर केले.
या पक्षांतराचा फटका साऱ्याच पक्षांना बसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप,शिवसेना अशा सगळयाच पक्षात इनकमिंग आणि आऊट गोईंग सुरू आहे. सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे इनकमिंग जास्त आहे. त्याचा फटका दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला बसला. मात्र कार्यकर्त्यांच्या जीवावर पुन्हा एकदा मैदान मारु असा विश्वास बाळगत सगळेजण महापालिकेसाठी तयारी करत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले. निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अनेकांनी पक्ष आणि नेता बदलला. पक्ष प्रवेशाचे सोहळे कधी मुंबईत, कधी ठाण्यात तर कधी कोल्हापुरात रंगले. आतापर्यंत ज्यांच्या विरोधात राजकारण केले त्यांचे नेतृत्व स्विकारले. महापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्वाची पदे भूषविलेल्या मंडळींनी या पक्षातून त्या पक्षात उडया टाकल्या. माजी महापौर सई खराडे या मूळच्या काँग्रेसच्या. २००६ मध्ये महापौर असताना त्या जनसुराज्य पक्षात दाखल झाल्या. महापौरपद टिकवलं. आता त्या शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे नगरसेवकपदासाठी तयारी करत आहेत. १९९९ मध्ये काँग्रेसकडून माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. दोन नंबरची मते घेतली.आता त्यांचे चिरंजीव इंद्रजीत आडगुळे हे शिवसेनेत दाखल झाले.
माजी महापौर सुनील कदम, माजी महापौर सरिता मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईकनवरे, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, रशीद बारगीर ही सारी मंडळी मूळची काँग्रेसची. आजरेकर या अपक्ष निवडून आल्या होत्या, मात्र त्यांना महापौर काँग्रेस कोटयातून मिळाले होते. आता हे सारे जण शिवसेनेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. ताराराणी आघाडीचे महापालिकेतील गटनेते सत्यजित कदम, शिवसेनेतून निवडून आलेले अभिजीत चव्हाण, राष्ट्रवादीतून निवडून आलेले अनुराधा खेडकर, आनंदराव खेडकर, ताराराणी आघाडीतून निवडून आलेले अर्चना पागर, कविता माने, सीमा कदम, पूजा नाईकनवरे यांनी हाती धनुष्यबाण घेतला आहे. सत्यजित कदम यांच्याकडे शिवसेना जिल्हा समन्यवकपदाची जबाबदारी आहे.
माजी महापौर सूरमंजिरी लाटकर व स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर हे महापालिकेत निवडून आले राष्ट्रवादीतून. राजेश लाटकर हे राष्ट्रवादीतील बिनीचे शिलेदार. मुश्रीफ यांचे हार्ट असे म्हटले जाई. गेली काही वर्षे ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.माजी नगरसेवक विनायक फाळके काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. काँग्रेसकडून निवडून आलेले माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार हे सध्या भाजपात आहेत. राष्ट्रवादीतून स्वीकृत नगरसेवक बनलेले उत्तम कोराणे व्हाया शिवसेनेतून भाजपात पोहोचले. माजी नगरसेवक अमोल माने यांनी राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे पक्ष ते राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असा प्रवास केला. ताराराणी आघाडीतून निवडून आलेले ईश्वर परमार, महेजबीन रियाज सुभेदार हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. भाजपाकडून २०१५ मध्ये निवडून आलेले कमलाकर भोपळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे घडयाळ हाती बांधले. स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पोवार यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला तर प्रकाश काटे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सामील झाले. माजी महापौर दिपक जाधव, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मुरलीधर जाधव सध्या भाजपात आहेत. ताराराणी आघाडीचे विलास वास्कर भाजपावासी झाले. ताराराणी आघाडीचे नगरसेवक असलेले निलेश देसाई सध्या भाजपात आहेत तर रत्नेश शिरोळकर यांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. अजित मोरे, रामचंद्र भाले, स्मिता माळी, राजू हुंबे, जहाँगीर पंडत, गीता गुरव, दिगंबर फराकटे, संभाजी जाधव, भरत लोखंडे, रिना कांबळे, अश्विनी बारामते, सुनंदा मोहिते, नंदकुमार गुजर, रमेश पुरेकर, मृदुला पुरेकर यांनी पक्षांतर करत शिवसेनेत दाखल झाले आहेत.