ग्रामपंचायत हे लोकशाहीतील पवित्र मंदिर, वळसंगला निधीची कमतरता पडणार नाही-आमदार गोपीचंद पडळकर
schedule30 May 25 person by visibility 548 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ग्रामपंचायत हे लोकशाहीतील पवित्र मंदिर आहे. याद्वारे नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसोबतच ग्रामविकास साधला जातो. वळसंग ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा हा साऱ्यांच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानास्पद आहे. वळसंगला विकासकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.’अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
वळसंग ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (२९ मे २०२५) रोजी अतिशय दिमाखात पार पडला. युवा नेते सागर खोत, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. रवींद्र आरळी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सरपंच पूजा रमेश माळी यांनी सरपंचपदाच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देणाऱ्या ‘विकास पर्व’ पुस्तिकेचे प्रकाशन आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले.
आमदार पडळकर यांनी भाषणात जत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील सगळया गावांना पाणी देण्याची व्यवस्था करू. एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प आणू. तालुक्यात एमआयडीसीचा विस्तार करू. मोठया कंपन्या एमआयडीसीमध्ये आणून रोजगार निर्मितीला चालना देऊ.’ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, सागर खोत यांनी भाषणात वळसंगमधील विविध विकासकामांना नेहमीच प्राधान्य राहील अशी ग्वाही दिली.
सरपंच पूजा माळी यांनी प्रास्ताविकात गावातील विकासकामांचा आढावा घेतला. साऱ्यांच्या सहकार्यामुळे ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण झाले अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी विलास राठोड, प्राचार्य जी. पी. माळी, आनंदा लोकरे, सुनील पवार, उपसरपंच वंदना निळे, माजी सरपंच महादेव माळी, गोदाबाई कबाडगे, तंटामुक्त समितीचे आप्पा यादव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिकांची उपस्थिती होती.केंचराव वगरे यांनी आभार मानले.