मिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !!
schedule18 Sep 24 person by visibility 390 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागातर्फे अनंत चतुदर्शीला कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी ध्वनी प्रदूषण पातळीचे मापन केले. यामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा ध्वनी प्रदूषण पातळीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळेस ध्वनी प्रदूषण पातळीचे मापन केले आहे. ध्वनी प्रदूषण नियम २००० च्या मानांकनानुसार शांतता क्षेत्र, रहिवासी, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र या चारही क्षेत्रात सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकीचा आवाज मोठा होता. दरम्यान रात्री बारा नंतर मिरवणूक मार्गावरील साऊंड सिस्टीम बंद केल्याने आवाजाची पातळी कमी झाली.
शहरातील चार क्षेत्रामधील २२ ठिकाणांचे ध्वनीमापन केले. यामध्ये शहरातील सर्वच् ठिकाणी मोजलेला आवाज हा ध्वनी प्रदूषण नियम २००० च्या मानांकनापेक्षा जास्त दिसून आला. मानांकनाच्या नियमावलीनुसार सायंलेट क्षेत्रात आवाजाची मर्यादा चाळीस डेसिबल इतकी आहे. सीपीआर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा कोर्ट आणि शिवाजी युनिव्हर्सिटी परिसर हा सायंलेट झोनमध्ये समाविष्ठ आहे. विसर्जन मिरवणुकीत या परिसरातील मंडळाच्या मिरवणुकीतील साऊंड सिस्टिमची आवाज मर्यादा सीपीआर परिसरात ५९. ६ डेसिबल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ६१.२, जिल्हा कोर्ट परिसरात ६८.८ तर ते शिवाजी युनिव्हर्सिटी परिसरातील मंडळाच्या मिरवणुकीत हा आवाज ७१ डेसिबलपर्यंत वाढला होता.
निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा ४५ डेसिबलपर्यंत आहे. मात्र मिरवणुकीदिवशी शिवाजी पेठेत ७९.३, मंगळवार पेठेत ८१.१, उत्तरेश्वर पेठेत ८२.६, राजारामपुरीत ९५.३, नागाळा पार्क परिसरात ७६.१ तर ताराबाई पार्क परिसरात ८३.३ डेसिबल होते.व्यापार (कमर्शियल) क्षेत्रमध्ये ५५ डेसिबलपर्यंत मर्यादा असते. दरम्यान या क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या लक्ष्मीपुरीमध्ये ६३.९, बिंदू चौकात ७४.८, मिरजकर तिकटी येथे ७६.६, बिनखांबी गणेश मंदिर येथे ६०.५, महाद्वार रोड येथे ८७.५, पापाची तिकटी येथे ९०.१, गंगावेश येथे ९४.३, शाहूपुरीत ८४.९, तर राजारामपुरीमध्ये ९५.३ डेसिबल होते. इंडस्ट्रीयल क्षेत्रात आवाजाची मर्यादा ७० डेसिबलपर्यंत आहे. मात्र मिरवणुकीदिनी वायपी पोवारनगरमध्ये ६६ डेसिबल इतका आवाज होता. तर उद्यमनगर परिसरात ७८.४ डेसिबलपर्यंत आवाज वाढला होता.