सदाशिव येजरेंच्याकडून दोन्ही पदाचा कार्यभार काढला ! नव्या अधिकाऱ्यांच्याकडे कार्यभार !!
schedule09 May 25 person by visibility 95 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता व इमारत उपविभागातील उपअभियंता सदाशिव येजरे यांच्याकडून दोन्ही पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. दरम्यान येजरे हे वैद्यकीय कारणास्वत रजेवर गेले आहेत.
येजरे यांनी नियमांना बगल देत स्वत:च्या मुलाला दुकानगाळा भाड्याने दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. भाऊसिंगजी रोड येथे जिल्हा परिषदेचे व्यापारी संकुल आहे. या इमारतीमधील दुकानगाळा येजरे यांनी मुलाला भाडयाने देताना नियम पाळले नाहीत. या विषयावरुन कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी येजरे यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्या नोटिसला उत्तर देताना येजरे यांनी अनावधनाने हा प्रकार घडल्याचे म्हटले होते. बांधकाम विभाग गेले काही दिवस अधिकाऱ्यांमधील कुरघोडीवरुन चर्चेत आहे. इमारत उपविभागातील शाखा अभियंता प्रदीप हुपरे यांनी कागलकर हाऊस परिसरातील पाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्रार उपअभियंता येजरे यांनी कार्यकारी अभियंता सांगावकर व सीईओ कार्तिकेयन एस यांच्याकडे केली होती. या प्रकरणी हुपरे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. हुपरे यांनी प्रशासनाला दिलेल्या खुलासामध्ये येजरे यांच्या सांगण्यावरुन आपण पाण्याच्या टाकीसंदर्भातील कार्यवाही केल्याचे म्हटले होते.
दरम्यान दुकाळगाळा भाडयाने देण्यावरुन येजरे यांना नोटीस काढण्यात आली होती. येजरे हे ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. प्रशासनाने दुकानगाळा भाडा देण्याच्या प्रकरणाची चौकशी केली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी गुरुवारी, (८ मे २०२५) रोजी येजरे यांच्याकडील उपकार्यकारी अभियंता व इमारत उपविभागातील उपअभियंतापदाचा कार्यभार काढून घेण्याची कारवाई केली. त्यांच्यापदाचा कार्यभार नवीन अधिकाऱ्यांच्याकडे दिला आहे. बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंतापदाचा कार्यभार गडहिंग्लज येथील उपअभियंता राहुल माळी यांच्याकडे तर इमारत उपविभाग उपअभियंतापदाचा कार्यभार कागल येथील उपअभियंता आर. बी. पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.