महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होणार
schedule15 Sep 25 person by visibility 86 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर एकूण ५५ हरकती नोंदविल्या आहेत. यामध्ये बहुसदस्यीय प्रभार रचनेवरही हरकती व सूचना केल्या आहेत. दरम्यान या हरकती व सूचनावर १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ९ ते १३ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत अधिसूचनाद्वारे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोल्हापुरात चार सदस्यीय प्रभाग रचना केली आहे. एकूण ८१ सदस्य आहेत. एक ते १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर वीस क्रमांकाचा प्रभाग हा पाच सदस्यीय आहे.
दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तीन सप्टेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. त्यावर तीन ते १५ सप्टेंबर या कालावधीत हरकती मागविल्या होत्या. या कालावधीत ५५ हरकती व सूचना महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात पंधरा सप्टेंबर रोजी ३४ हरकती प्राप्त झाल्या. यामध्ये प्रभागाची हद्द, ठिकाणांच्या नावांमध्ये बदल, पूर्वीच्या प्रभागांचे विभाजन न होणे, बहुसदस्यीय प्रभार रचनेवरही हरकती नोंदविल्या आहेत.
या प्राप्त हरकती व सुचनावर सुनावणी झाल्यानंतर त्या सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागास २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत सादर होणार आहेत. जिल्हाधिकारी अथवा आयुक्तामार्फत नगर विकास विभागास प्रभाग रचना सादर होईल. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेली अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होते. याकरिता २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा कालावधी आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मंजुरी दिली जाते. ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.