साधेपणाने होणार क्रिडाईच्या दालन प्रदर्शनाचा प्रारंभ
schedule28 Jan 26 person by visibility 20 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूने महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. पवार यांनी नेहमी क्रिडाईला पाठबळ दिले आहे. त्यांना आदरांजली म्हणून शुक्रवार (ता. ३०) पासून आयोजित केलेल्या दालन-२०२६ या प्रदर्शनाचा प्रारंभ साधेपणाने होईल, अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत आणि दालनचे अध्यक्ष महेश यादव यांनी दिली.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम आणि वास्तूविषयक ‘दालन-२०२६’ प्रदर्शन ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान महासैनिक सैनिक दरबार हॉलच्या मैदानावर आयोजित केले आहे. त्यात ११० बांधकाम व्यावसायिकांच्या सुमारे तीनशेहून अधिक प्रकल्पांची आणि बांधकामविषयक माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
या ‘दालन’चे उद्घाटन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आयोजित केले होते. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह क्रिडाईचे राज्य पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रातील जनकल्याणकारी, कर्तव्यदक्ष आणि संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे. त्यांना आदरांजली म्हणून दालनचे उदघाटन साधेपणाने करण्यात येणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून दालनची तयारी क्रिडाई कोल्हापूरने केली आहे. कोल्हापूरसह राज्य आणि देशभरातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत प्रदर्शन रद्द करणे शक्य होणार नाही. त्यामुळे साधेपणाने दालन प्रदर्शनाचा शुक्रवारी प्रारंभ होईल आणि पुढील तीन दिवस प्रदर्शन सुरू राहील. त्यासाठी ग्राहक, बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खोत आणि यादव यांनी केले आहे.
........
“ महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसह प्रत्येक घटकांना पाठबळ देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असे अचानक जाणे क्लेशदायक आहे. क्रिडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. पवार कुटुंबियांच्या दुःखात क्रिडाई कोल्हापूर सहभागी आहे.’’
- महेश यादव, अध्यक्ष, दालन २०२६
..............................
“ उपमुख्यमंत्री अजित पवार हे क्रिडाईचे मार्गदर्शक होते. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी ते सकारात्मक होते. सातत्याने याबाबत ते व्यक्त व्हायचे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्यासारख्या एका धडाडीच्या नेतृ्त्वाचे असे अचानकपणे आपल्यातून निघून जाणे अत्यंत दुःखदायक आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही दालन प्रदर्शनाचा प्रारंभ साधेपणाने करणार आहोत.”
-के. पी. खोत, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर