नवे सभागृह…नवे गटनेते, महापालिका राजकारणात लागणार कसोटी !
schedule28 Jan 26 person by visibility 8 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तब्बल दहा वर्षानंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली. पाच वर्षाची प्रशासक राजवट संपून आता नवीन सभागृह अस्तित्वात येत आहे. सहा फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर निवड आहे. दरम्यान पक्षीय पातळीवर गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ३४ जागा जिंकल्या. मात्र ते बहुमतापासून दूर राहिले. निवडणुकीत महायुतीची सरशी झाल्यामुळे काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले. दरम्यान काँग्रेस पक्षाने गटनेतेपदी तरुण चेहरा दिला आहे. नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. बोंद्रे हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यंदा ते प्रभाग क्रमांक आठ मधून निवडून आले आहेत. २०१० ते २०१५ या कालावधीतील सभागृहात त्यांनी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर प्रभागातून प्रतिनिधीत्व केले आहे. २०१५ मध्ये त्यांच्या आई शोभा बोंद्रे या चंद्रेश्वरमधून निवडून आल्या होत्या. त्या महापौरही झाल्या.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविली. या महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरलायग्. भाजपचे २६ नगरसेवक निवडून आले आहेत. गटनेता निवडीसाठी भाजपच्या नेतेमंडळींनी नगरसेवकांची मते आजमावली. बंद पाकिटातून नावे मागविली. भाजप प्रदेशकडे नावे पाठविली. प्रदेश पातळीवरुन चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मुरलीधर जाधव यांच्या खांद्यावर गटनेतेपदाची धुरा सोपविली. जाधव हे प्रभाग क्रमांक सोळामधून निवडून आले आहेत. २००५ पासून ते सभागृहात प्रतिनिधीत्व करत आहेत. राजारामपुरी एक्स्टेंशन, ताराराराणी विद्यापीठ राजारामपुरी प्रभागातून विजयी झाले होते. विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापतीपदाचा अनुभव आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पंधरा नगरसेवक निवडून आले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेची उच्चांकी सदस्यसंख्या आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्याकडे आहे. नव्या सभागृहात देशमुख शिवसेनेचे गटनेते म्हणून दिसणार आहेत. दहा वर्षे ते काँग्रेसचे गटनेते म्हणून सभागृहात छाप उमटविली होती. सानेगुरुजी वसाहत, रंकाळा तलाव प्रभागातून यापूर्वी विजय मिळवला होता. यंदा त्यांनी प्रभाग क्रमांक नऊमधून विजयी परंपरा कायम ठेवली. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीवरुन निर्माण झालेल्या नाराजी नाटयातून त्यांनी काँग्रेसला रामराम केला. सात, आठ महिन्यापूर्वी ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये देशमुख यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसच्या महापालिका गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे नगरसेवक आदिल फरास यांची निवड झाली. फरास यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. महापालिकेत दोन्ही काँग्रेस सत्तेत असताना फरास हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कारभारी म्हणून काम पाहत होते. स्थायी समितीपदी त्यांनी काम केले आहे गेल्या सभागृहात राष्ट्रवादीचे चौदा सदस्य होते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची घसरण होऊन केवळ चार जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले आहे. २०१० मध्ये ते शाहू मैदान प्रभागातून निवडून आले होते.तर २०१५ मधील निवडणुकीत त्यांच्या आई हसीना बाबू फरास या श्री महालक्ष्मी मंदिर प्रभाग येथून निवडून आल्या होत्या. त्या महापौर बनल्या. यंदाच्या निवडणुकीत आदिल फरास यांनी प्रभाग बारामधून विजय प्राप्त केला आहे. दरम्यान गटनेते म्हणून निवड झालेले चारही सदस्यांनी यापूर्वी महापालिका सभागृहात काम केले आहे. ८१ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात काठावरचे बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, येत्या पाच वर्षात महायुती म्हणून गट एकत्र ठेवताना कायम दक्ष राहावे लागणार आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससमोर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवताना साऱ्या नगरसेवकांची एकजूट कायम ठेवण्याची कसोटी आहे.