Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

बोगस डॉक्टरमुक्त गावे जाहीर करा; जिल्हाधिकाऱ्यांचा आरोग्य विभागाला डोस

schedule27 Jan 26 person by visibility 75 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वसामान्यांची होणारी फसवणूक, आरोग्याशी चाललेला खेळ आणि कायद्याचे उल्लंघन करून जे कोणी चुकीच्या पद्धतीने उपचार करत असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. प्रत्येक गावोगावी आणि शहरांमध्ये विशेष मोहीम राबवून अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी. जिल्ह्यातून बोगस डॉक्टर ही संकल्पनाच हद्दपार करून गावे 'बोगस डॉक्टरमुक्त' असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बोगस डॉक्टर विरोधी समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, डॉ. उत्तम मदने  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी तक्रार पेटीची व्यवस्था करून त्यातील तक्रारींची दैनंदिन तपासणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. तसेच रस्त्याच्या कडेला गाड्या लावून उपचाराचा दावा करणाऱ्या अमान्यताप्राप्त लोकांवरही कायदेशीर बडगा उचलावा. आवश्यक पदवी किंवा वैद्यकीय कौशल्य नसताना कोणी उपचार करत असेल तर पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.

आरोग्य विभागातील क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी गांभीर्याने घेऊन एक महिना तपासणी मोहीम राबवावी. गावपातळीवर पोलीस पाटीलांना प्रशिक्षित करून बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळवावी आणि फेब्रुवारी महिन्यात ही कारवाई अधिक तीव्र करावी, असेही त्यांनी नमूद केले. शहरातील परवानाधारक दवाखान्यांमध्येही चुकीच्या पद्धतीने किंवा नियमांचे उल्लंघन करून उपचार दिले जातात का, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ओपीडीच्या वेळा सोडून पहाटे किंवा रात्री उशिरा रुग्णांना गोपनीयरीत्या बोलावून चुकीच्या पद्धतीने उपचार करणे किंवा त्यांची फसवणूक करणे असे प्रकार आढळल्यास, संबंधित डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes