विटा शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा-मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
schedule29 Jul 24 person by visibility 466 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील ‘विटा शहर नळ पाणीपुरवठा योजना’ मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.
बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, सांगली जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंदराज आदी उपस्थित होते. विटा शहराची २०५५ पर्यंतची एक लाख चार हजार ३३५ लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच पाणी उपलब्धतेसह अनुषांगिक तांत्रिक बाबी आदी प्राधान्याने पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या. राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे ८७ कोटी १८ लाख रुपये खर्चाच्या या योजनेत कृष्णा नदीवरून आणि टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील ओझर तलाव येथून असे दोन स्त्रोत असणार आहेत.
योजनेत पहिल्या टप्प्यात २०२५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ४. ६९ दलघमी पाणी उपलब्ध करून घेतले जाणार आहे. यातून विटा शहराची दैनंदिन १२. ८६ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भागविता येणार आहे.