महाविकास आघाडीतून स्वाभिमानी बाहेर : राजू शेट्टींची घोषणा
schedule05 Apr 22 person by visibility 999 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडीसोबतचे संबंध संपले असे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्ष राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केले. शेट्टी हे गेली काही महिने महाविकास आघाडीवर नाराज होते.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीककर्ज यासह शेतीशी निगडीत अन्य विषयावरुन महाविकास आघाडी सरकारने भ्रमनिरास केला अशी जाहीर टीका त्यांनी केली होती. महाविकास आघाडीसोबत राहायचे की नाही हे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत फैसला होईल हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसीय चर्चेनंतर शेट्टी यांनी मंगळवारी सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाविकास आघाडीसोबत संबंध संपले असे घोषित केले. हातकणंगले तालुक्यातील विशाल मंगल कार्यालय येथे स्वाभिमानीच्या कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक झाली. तसेच राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून माझे नाव वगळावे अशी मागणी त्यांनी राज्यपाल यांच्याकडे केली. यासाठी ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.